Lockdown Update : मुंबईत सध्यातरी तातडीने लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, बीएमसी आयुक्तांची माहिती
Corona Update: मुंबईतील स्थिती अजूनतरी हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे लगेच लॉकडाऊन लावण्याची सध्या गरज नाही, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी म्हटलं आहे.
मुंबई : राज्यात आणि मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र मुंबईत सध्यातरी तातडीने लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी म्हटलं आहे. मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला महापालिका आयुक्तांनी माहिती दिली.
मुंबईतील स्थिती अजूनतरी हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे लगेच लॉकडाऊन लावण्याची सध्या गरज नाही. मात्र मुंबईकरांनी गांभीर्गाने कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन केलं नाही तर भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागू शकतील, असा इशाराही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिला. मुंबईतील कोविड चाचण्यांची संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह केसेसमध्ये वाढ झाली आहे. काल (8 फेब्रुवारी) 23000 कोविड 19 चाचण्या करण्यात आल्या.
याआधी म्हणजे जानेवारीपर्यंत 10 ते 12 हजारच चाचण्या केल्या जात होत्या. त्या चाचण्या आता सातत्याने वाढवण्यात येत आहेत. मुंबईत दर 100 चाचण्यांमागे केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्के आहे. इतर ठिकाणचा पॉझिटीव्हिटी रेट मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन संदर्भातला विचार होऊ शकतो, मात्र, मुंबईत ती स्थिती नाही, असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं.
कुठे किती पॉझिटीव्हिटी रेट
पुणे- 15 टक्के
विदर्भ- 25 टक्के (काही ठिकाणी 50 टक्के)
नाशिक- 15 टक्के
मुंबई- 6 टक्के
मुंबईतील कोरोनामुळे होणारा मृत्यूदरही खालावला आहे. आधी 4.5 टक्के असणार मृत्यूतर आता 4.1 टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही 5 टक्क्यांनी वाढली आहे. महिनाभरापूर्वी 80 टक्के लक्षणं नसलेले रुग्ण आता 85 टक्क्यांवर आला आहे.