Diwali 2022 : एसटीच्या अधिसंख्य पदावरील 590 कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, तात्काळ हस्तक्षेप करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती
Diwali 2022 : एसटी महामंडळाच्या अधिसंख्य पदावरील 590 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट न मिळाल्याने त्यांना दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे. यात हस्तक्षेप करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
![Diwali 2022 : एसटीच्या अधिसंख्य पदावरील 590 कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, तात्काळ हस्तक्षेप करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती No Diwali gift for 590 employees in ST adhisankhya post request CM Eknath Shinde to intervene immediately Diwali 2022 : एसटीच्या अधिसंख्य पदावरील 590 कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, तात्काळ हस्तक्षेप करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/24/90b696f43e836a697b8abc0b0637d884166131327414583_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Diwali 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Maharashtra State Road Transport Corporation) पाच हजार रुपये दिवाळी (Diwali 2022) भेट देऊन राज्य सरकारने त्यांची दिवाळी गोड केली. परंतु एसटी महामंडळाच्या अधिसंख्य पदावरील 590 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट न मिळाल्याने त्यांना दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे. महामंडळाने दिवाळी भेट म्हणून जाहीर केलेली 5 हजार रुपयांची रक्कम अधिसंख्य पदावर काम करणाऱ्यांना तात्काळ मिळावी, यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
2016 पासून युती सरकारच्या काळात तात्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अनेक वर्षे बंद असलेले सानुग्रह अनुदान दिवाळी भेट म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गेल्या वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना 2500 रुपये अधिकाऱ्यांना 5000 रुपये अशी रक्कम दिली जात होती. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 5000 रुपये इतकी रक्कम देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पण या संदर्भातील परिपत्रक जारी करताना महामंडळ स्तरावर संबंधित दिवाळी भेटीची रक्कम अधिसंख्य पदावर काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देय असणार नाही, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. एसटी महामंडळातील इतर कर्मचाऱ्यांना मात्र ज्यांचे 18 ऑक्टोबर 2022 रोजी हजेरी पत्रकावर नाव आहे त्यांना ही रक्कम देण्यात आली आहे. मात्र अधिसंख्य पदावर जे कर्मचारी आणि अधिकारी 18 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यरत आहेत त्यांना सुद्धा ही दिवाळी भेटीची रक्कम मिळणं क्रमप्राप्त असताना त्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे, असं श्रीरंग बारणे यांनी पत्रात लिहिलं आहे.
'अधिसंख्य पदावरील कर्मचारी अधिकाऱ्यांनाही दिवाळी भेट द्या'
मानवतावादी दृष्टिकोन आणि महामंडळाची ओळख म्हणून तसंच सामाजिक दृष्टिकोन ठेवून अधिसंख्य पदातील चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांना गणवेश, शिलाई भत्ता, धुलाई भत्ता तसंच वैद्यकीय भत्ता दिले जात आहेत. मग याच भावनेतून दिवाळी भेट का दिली जात नाही? असा सवालही बरगे यांनी विचारला आहे. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून दिवाळीसाठी महामंडळातील इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे 5000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून दिली आहे, त्याच भावनेने 5000 रुपये अधिसंख्य पदावर काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही द्यावी, अशी मागणीही बरगे यांनी पत्राद्वारे केली आहे.
म्हणून अधिसंख्य पदाची निर्मिती
अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना 21 जुलै 2021 रोजी जे वेतन मिळत होते त्याच कायम (स्थिर) वेतनावर ठेवण्यात आलं आहे. रोजगार टिकावा तसंच मानवतावादी दृष्टिकोन आणि प्रशासनाची अडचण समजून राज्य शासनाने संबंधित पद निर्माण केलं. या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोकरीत कायम ठेवलं आहे. याशिवाय त्यांना कोणतेही आर्थिक लाभ देऊ नयेत असेही निकष सरकारने घालून दिले आहेत. तर राज्य परिवहन महामंडळानेही मानवतावादी दृष्टिकोन म्हणून नोकरी देताना या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त आणि त्या त्या पदाची ओळख म्हणून गणवेश, त्याला लागणारा शिलाई भत्ता आणि धुलाई भत्ता सुद्धा दिला आहे. याशिवाय आरोग्य सुविधा म्हणून वैद्यकीय भत्ता सुध्दा दिली आहे.
संबंधित बातमी
Diwali Gift for ST Workers: एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; पाच हजार रुपयांची दिवाळी भेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)