डोंबिवलीतल्या लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत, लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज अंदाजे पाच लाख प्रवासी मुंबईला ये-जा करत असतात. मात्र या प्रवाशांसाठी सकाळच्या सत्रात डोंबिवलीहून सुटणाऱ्या फक्त दोन फास्ट लोकल आहेत.
![डोंबिवलीतल्या लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत, लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी NCP MP Supriya Sule demands to extend rounds of Dombivli local in Parliament डोंबिवलीतल्या लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत, लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/03185655/supriya-on-local.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : डोंबिवली आणि रेल्वेच्या समस्या हे समीकरण काही नवीन नाही. मात्र आता डोंबिवलीकरांच्या याच समस्या थेट लोकसभेत पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या डोंबिवलीकरांचा लोकसभेतल्या आवाज बनल्या आहेत. मध्य रेल्वेवरचं सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक अशी डोंबिवलीची ओळख आहे. मात्र ही गर्दी सामावून घेण्यासाठी रेल्वेसेवा अपुरी पडतेय आणि याबाबत डोंबिवलीकरांची अनेक वर्षांपासूनची ओरड आहे. मात्र याकडे आजवर कुणीही लक्ष दिलेलं नाही.
डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज अंदाजे पाच लाख प्रवासी मुंबईला ये-जा करत असतात. मात्र या प्रवाशांसाठी सकाळच्या सत्रात डोंबिवलीहून सुटणाऱ्या फक्त दोन फास्ट लोकल आहेत. डोंबिवली स्थानकातून दिवसभरात मुंबईसाठी 33 लोकल सुटतात, मात्र त्यापैकी फक्त दोन फास्ट लोकल आहेत. डोंबिवली स्थानकातून दिवसभरात जवळपास 850 लोकल मुंबईकडे जातात, मात्र या लोकल कल्याणहून खचाखच भरून येत असल्यानं डोंबिवलीकरांना त्यात शिरायलाही जागा मिळत नाही.
लोकलची गर्दी आणि दारात लटकून ओरवास करताना आजपर्यंत डोंबिवलीच्या सहा तरुण प्रवाशांचा मृत्यू झालाय. या सगळ्यातही डोंबिवलीकरांच्या संतापाचं खरं कारण म्हणजे सकाळी डोंबिवलीहून सुटणारी एक लोकल चक्क कल्याण रेल्वे स्थानकात नेऊन उभी केली जाते आणि मग डोंबिवलीत आणली जाते. त्यामुळे डोंबिवलीत ही लोकल येईपर्यंत कल्याणकर प्रवाशांनी ती भरून गेलेली असते. त्यामुळे हक्काची लोकल असूनही डोंबिवलीकरांना उभ्याने प्रवास करावा लागतो. डोंबिवलीचे प्रवासी कधी कल्याणला उलटे बसून गेले, तर कल्याणकर प्रवासी मारहाणीपर्यंत गेल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र डोंबिवलीकरांची व्यथा ऐकणारं कुणीही नसल्याची प्रवाशांची खंत आहे.
या सगळ्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आवाज उठवत डोंबिवली लोकल ही डोंबिवलीहूनच सोडली गेली पाहिजे अशी मागणी केली आहे. हे सगळं पाहून एका लोकलसाठी काय काय करावं लागतं, असं कदाचित सर्वांना वाटेल, परंतु या सगळ्याचं गांभीर्य फक्त लोकलने प्रवास करणारे प्रवासीच समजू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)