Navi Mumbai : रस्त्याच्या कामासाठी 2500 झाडांची कत्तल करण्याचा डाव
योग्य रित्या झाडांचे स्थलांतरण न करता एमआयडीसी आधिकार्यांनी रस्त्याचे काम हाती घेतल्याने पर्यावरण सामाजिक संस्थांनी या विरोधात पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
Navi Mumbai Latest News : एमआयडीसी महापे विभागीय कार्यालयाकडून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जवळपास अडीच हजाराच्या वर झाडांचा बळी यात जाणार आहे. योग्य रित्या झाडांचे स्थलांतरण न करता एमआयडीसी आधिकार्यांनी रस्त्याचे काम हाती घेतल्याने पर्यावरण सामाजिक संस्थांनी या विरोधात पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
विकास कामात अडथळा येणारी झाडे कापण्यासाठी किंवा दुसरीकडे स्थलांतरीत करण्यासाठी लोकांच्या हरकती सुचना मागवले गरजेचे आहे. याबाबत मुख्य वृतमानपत्रात जाहिराती देवून यावर जनजागृती केली जाते. मात्र, एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील स्थानिक दैनिकात याबाबत प्रसिध्दी देवून तडकाफडकी घाईने हरकती सूचना मागवल्या आहेत. याचा स्थानिक नागरिकांना सुगावा लागू नये अशी जाणिवपुर्वक खबरदारी अधिकारी वर्गाने घेतल्याचा आरोप पर्यावरण संस्थांनी केलाय. विशेष म्हणजे एमआयडीसी प्रशासनाकडे तज्ञ वृक्ष अधिकारी नसताना या हजारो झाडांच्या कत्तलीसाठी परवानगी देण्याची घाई करण्यात आली आहे.
कोपरी येथील नियोजित उड्डाणपुलासाठी सुमारे ३९० झाडांच्या कत्तलीचे प्रकरण ताजे असतानाच आता एमआयडीसी प्रशासनाने चार पावले पुढे टाकत रस्त्याच्या कडेला असलेल्या पुरातन वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे.एकूण अडीच हजारांच्या वर झाडांवर याची कुर्हाड कोसळणार आहे.
वृक्ष अधिकारी नसल्याने झाडांचे वयोमान, झाडांची गुणवत्ता आणि वृक्ष प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी न करताच सरसकट परवानगी देण्यासाठी हे अधिकारी कंत्राटदाराच्या दबावाखाली काम करीत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अध्यक्ष असलेल्या राज्यस्तरीय वृक्ष प्राधिकरणाने २०० पेक्षा अधिक वृक्ष कापण्यासाठी निश्र्चित नियमांना हे अधिकारी कात्रजचा घाट दाखवत आहेत.राज्य वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा न करताच एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे.
पर्यावणप्रेमींनी ही झाडे वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पर्यावरण सेवाभावी संस्थेने केली असून ही प्रक्रिया रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिला आहे.एम आय डी सी स्थापन होण्यापूर्वी ही झाडे या परिसरात होती.पन्नास वर्षापेक्षा जुनी असलेली झाडे तोडल्यास प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या या परिसरात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याची भीतीही शिंदे यांनी व्यक्त केली आहे. वृक्ष प्राधिकरणाचे अधिकार मनपाकडे सुपूर्द करण्याची मागणी या निमित्ताने जोर धरत असून याबाबत राज्य शासनाकडे मागणी केली जाणार आहे.