Navi Mumbai : भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर; पक्षात महिलांचा सन्मान होत नसल्याचा आरोप
Navi Mumbai : दोन वेळा विधानसभेवर निवडून येऊनही पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याची खंत आमदार मंदा म्हात्रे यांनी बोलून दाखवली. त्यामुळे नवी मुंबईतील दादा-ताई राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : बेलापूर मतदार संघातून दोन वेळा निवडून आलेल्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षातील नेत्यांकडून महिलांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे शहरातील स्थानिक राजकारणात गणेश नाईक विरूध्द मंदा म्हात्रे असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
वाशी येथे 1 सप्टेंबर रोजी भाजपा नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे लसीकरणे उदघाटन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठेवले होते. या वेळी ऐरोली आमदार गणेश नाईक यांना निमंत्रण होते. मात्र स्थानिक आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना नरेंद्र पाटलांनी डावलले होते. बॅनरवरून त्यांचे फोटोही गायब केले होते. हाच धागा पकडत मंदा म्हात्रे यांनी जाहीर भाषणात पक्षावर तोंडसुख घेतले.
दोन वेळा विधानसभेवर निवडून येऊनही पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याची खंत आमदार मंदा म्हात्रे यांनी बोलून दाखवली. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्याने स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिलांचे पंख छाटले जात आहेत. 2019 ला पक्षाने तिकीट मिळो किंवा न मिळो, आपण अपक्ष लढणार होतो, तसे संकेत वरिष्ठांना दिले होते असा गौप्यस्फोट करीत आपले हात दगडाखाली नसल्याने आपण कुणाला घाबरत नसल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
सन 2014 साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मोदी लाटेत निवडून आल्याचा आपल्यावर आरोप झाला. पण 2019 ला मोदी लाट नसताना आपण स्वत:च्या कामावर प्रचंड मतांनी निवडून आलो असल्याचा दावा मंदाताई यांनी केलाय. होत असलेल्या अन्यायाबाबत वरिष्ठ नेत्यांना अनेक वेळा सांगूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतापाचा स्फोट जाहीर भाषणात झाल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबईत मंदाताई म्हात्रे विरूध्द गणेश नाईक असा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांना साथ दिली. त्यांचे काम पाहून पवार यांनी मंदाताईंना महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. यानंतर विधानपरिषदेची आमदारकीही दिली होती. याच दरम्यान शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
महानगरपालिकेत सुरु असलेला दादा-ताई संघर्ष नंतर राज्य पातळीवर गेला. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत येताच शिवसेनेकडे असलेल्या महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा फडकावला. ठाणे लोकसभेत मोठे सुपूत्र संजीव नाईक यांना खासदार, ऐरोली मतदार संघात छोटे युवराज यांना आमदार, पुतणे सागर नाईक यांना महापौर आणि स्वत: बेलापूर मतदार संघात आमदार बनून आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते.
एकाच म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. त्याप्रमाणे नवी मुंबई राष्ट्रवादीत या दोघांचा संघर्ष टिकेला गेला होता. अखेर पक्षातील राजकारणाला कंटाळून मंदाताई यांनी 2014 ला भाजपात प्रवेश केला. यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपातून उभ्या राहिलेल्या मंदाताई राष्ट्रवादीचे मंत्री गणेश नाईक यांचा पराभव करीत जायंट किलर ठरल्या होत्या.
पुढील पाच वर्ष जातात की नाही तोवर परत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. यानंतर नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली दोन्ही मतदार संघावर नाईक यांनी दावा केल्याने परत एकदा भाजपात दादा विरूध्द ताई असा संघर्ष सुरू झाला. पक्षाने अखेर आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना बेलापूर विधानसभेचे तिकीट देत ऐरोलीतून संदीप नाईक यांच्या जागी गणेश नाईक यांना उमेदवारी दिली होती. सध्या दोन्ही विधानसभेवर भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. एकाच पक्षात असूनही नवी मुंबईत दोघांमधील शीतयुध्द मात्र अद्याप संपलेले नाही.
महत्वाच्या बातम्या :