अवघ्या 22 दिवसात मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर, बीएमसी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपचे डावपेच?
Narendra Modi Mumbai Visit: गेल्या महिन्यात मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी अनेक विकास कामांचं उद्धाटन केलं होतं, आजच्या दौऱ्यातही ते काही विकास कामांचं उद्धाटन करतील.
मुंबई: एका महिन्याच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईचा हा दुसरा दौरा असेल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दोन्ही मुंबई दौऱ्याची राजकीय चर्चा चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळतंये. आधीच्या दौऱ्यात मोदींनी मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. शिवाय मुंबई महापालिकेच्या अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले. तर या दौऱ्यामध्ये बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. सोबतच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच ते मुंबईतील काही विकास कामांचंही उद्धाटन करणार आहेत.
गेल्या महिन्यात, 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा केला आणि या एकाच दौऱ्यात मुंबईकरांना मोठं गिफ्ट देण्यात आलं. मुंबईकरांच्या विकासासाठी आवश्यक आणि महत्वाकांशी विकासकामांचं भूमीपूजन, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पहिल्या दौऱ्यात केलं. शिवाय मुंबईकरांचा विकास साधायचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा सत्ता मिळाली तर हा विकास साध्य होईल असं मोदींनी भाषणात सांगितलं. त्यांनी मुंबईकरांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी विकासावर जाहीरपणे संबोधन केलं. शिवाय आतापर्यंत 25 वर्ष सत्तेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटावर खोचक टीकासुद्धा केली.
पंतप्रधानांचा दुसरा दौरा
पंतप्रधानांचा हा एक दौरा होताच 10 फेब्रुवारीला म्हणजे 30 दिवसातच दुसऱ्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. दुसऱ्या दौऱ्यात मुंबईतील मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधान सेल्फी कॅम्पसचे उद्घाटन करतील. शिवाय बोहरा मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतील. बोहरा मुस्लिम समाजासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अगदी गुजरातपासून संबंध जरी असले तरी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणची उपस्थिती चर्चेचा विषय बनलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या दौऱ्यात कोणत्या विकास कामांचं उद्घाटन
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत गाड्यांना पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा.
बोहरा मुस्लीम समुदायाच्या मरोळ येथील अलजेमा-तूस सैफिया (सैफी अॅकेडमी) संकुलाचे उद्घाटन.
दिव्यांगासाठी अनुकूल वैशिष्टयसह आच्छादित प्लॅटफॉर्मचे उद्घाटन.
फूड कोर्ट , मुलांसाठी खेळण्याची जागा ,स्थानिक उत्पादनांसाठी जागा, इत्यादी व्यवस्थेचे उद्घाटन.
मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाकोला ते कुर्ला उन्नत मार्ग आणि एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस उड्डाणपूलाचे उद्घाटन.
कुर्ला आणि मालाड येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन तसेच मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन.
मोदींच्या दोन्हीही मुंबई दौऱ्यामध्ये मुंबईकरांच्या दृष्टीने झालेल्या विकास कामांचं उदघाटन आणि मुंबईकरांना मिळालेले हे मोठे गिफ्टस. विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकरांचा विश्वास साध्य करण्यासाठी केला जाणारा हा भाजपचा मोठा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच पंतप्रधानांचा हा दौरा मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच नियोजित असल्याने महाविकास आघाडीसमोर आणि खास करून शिवसेना ठाकरे गटा समोर मुंबईत एक मोठा आव्हान देणारा आहे.