कोळीवाड्यांचे प्रश्न आतातरी सुटणार का? नारळी पोर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा चर्चा
Narali Purnima 2022 : कोळीबांधवांच्या घरांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून नवे सरकार यामध्ये दखल देणार का असा सवाल केला जात आहे.

मुंबई : मुंबईतील कोळीवाड्यांचे (Mumbai Koliwada) सीमांकन, घरांचे पुर्नविकास, कोळीवाड्यातील जागांचे संरक्षण हे सगळे कोळीवाड्यातील प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकार दरबारी हे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा आगरी कोळी समाजाच्या समित्या आणि आगरी कोळी बांधव करत आहेत. अद्याप त्याला यश आलेलं नाही. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारकडून कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवले जातील का? आगरी कोळी बांधवांच्या प्रश्नांकडे हे सरकार लक्ष देईल का? असे प्रश्न पडणारी चर्चा मुंबईत आज नारळी पौर्णिमेनिमित्त आहे.
मुंबईचे मूळ रहिवासी म्हणजे कोळी बांधव. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत या कोळी बांधवांचे 40 हून अधिक कोळीवाडे आहेत. वर्षानुवर्षे हे कोळी बांधव या ठिकाणी राहत असून ते त्यांचा परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. यातील अनेकांनी आता काळानुसार इतर ही उद्योग, नोकरी करण्यास सुरवात केली आहे. यांची कुटुंबही आता वाढू लागली आहेत. त्यामुळेच त्यांना सतावू लागला आहे तो घरांचा प्रश्न आणि आहेत त्या घरांच्या पूनर्विकासाचा प्रश्न. मात्र राज्य सरकार योग्य पावला उचलत नाही आणि त्यातून विकास काही होत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा मुंबईचा मूळ रहिवासी चिंतेत आहे. अनेक सरकार आली आणि गेली, मात्र त्यांचा विकास झाला नाही. त्यामुळे या सरकारने तरी आमचा विकास करावा असं धारावी कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी बांधवाना वाटते.
आज सर्वत्र नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. त्यात अनेक ठिकाणी राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील उपस्थिती लावली. अशातच मुंबईतील वांद्रे पश्चिम खारदांडा येथे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्सव आयोजित केला होता. यावेळी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. त्यांनी आगरी कोळी बांधवांशी संवाद साधताना म्हटले की कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असून नव्या सरकारच्या येण्याने प्रश्न अधिक जलदगतीने सुटतील.
कोळी आगरी समाज ही मुंबईची शान आहे अस सांगणारे, आगरी कोळी समाजाचे कैवारी आम्हीच असल्याचं दाखवणारे अनेक राजकीय पक्ष आणि पुढारी आज नारळी पौर्णिमा निमित्ताने अनेक ठिकाणी कोळीवाड्यांमध्ये पाहायला मिळाले. मात्र या आगरी कोळी बांधवांसमोर असणारे प्रश्न आणि त्यांचा रखडलेल्या विकासाची दखल पुढील काळात ही राजकीय मंडळी घेणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
