(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई विमानतळास बाळासाहेबांचे नाही तर दि बा पाटलांचे नाव द्या, मनसेची मागणी
नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभा राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेने केली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आता मनसेने यात उडी घेत रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि बा पाटलांचे नाव द्या अशी मागणी केली आहे.
नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभा राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला मनसेने विरोध केला आहे. उभा राहत असलेले विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेने पत्रकार परिषद घेत केली आहे.रायगड आणि नवी मुंबई मनसेकडून ही मागणी करण्यात आली आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी समाजाची सुरुवातीपासूनची मागणी असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे नवी मुंबई आणि रायगड मधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला तीव्र विरोध केलाय. आगामी नवी मुंबई महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली असून दि बा पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचेही नाव विमानतळास देऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
महाराष्ट्रातील एखादया भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे. परंतु लाेकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी काेळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी केली आहे. दि. बा पाटील यांचं नाव द्यायची मागणी असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी करत जे राजकारण केलं आहे, ते निंदनीय आहे, असं देखील काळे यांनी म्हटलं आहे.