Vaccination : मुंबईत 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य, एक कोटी लसींसाठी पालिकेकडून जागतिक निविदा
मुंबई शहरात 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य असून त्यासाठी एक कोटी लसींसाठी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा काढण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा काढली आहे. मुंबई महानगरपालिकेचे 60 ते 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी ही माहिती दिलीय.
राज्य सरकार कोरोना लसीच्या थेट आयातीच्या शक्यतेवर विचार करत आहे, जेणेकरून जास्तीतजास्त लोकांना लसीकरण केलं जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. हे शक्य झाल्यास तीन आठवड्यांत मुंबईत सर्वांचं लसीकरण करण्याचा रोडमॅप असल्याचे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर आजची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईमधील लसीकरणाचा वेग वाढणार आहे.
मुंबईत ज्येष्ठ नागरिकाचं घरोघरी जाऊन लसीकरण
मुंबईत प्रभागवार रचनेनुसार एकूण 227 वॉर्ड आहेत. तेव्हा प्रत्येक वॉर्डात एक यानुसार हे कँप सुरू होण्याची शक्यता आहे. ही मोहीम खासकरून ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी असेल, कारण लसीकरणासाठी सध्या त्यांची फारच वणवण सुरू आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आलंय. भारतातही केंद्र सरकारनं किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा सुरू करायला हवी होती. जेणेकरून लसीकरणासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याचा धोका कमी झाला असता. या प्रक्रियेतून अनेकांचा प्राण वाचवता आले असते, असंही हायकोर्ट पुढे म्हटलं.
मुंबईत आज 2116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसून आली आहे. मुंबईत आज 2116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4293 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 66 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 38 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत आतापर्यंत 6 लाख 27 हजार 373 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर 176 दिवसांवर वर गेला आहे. काल मुबंईत 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6082 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.