Mumbai : व्याजासह तिप्पट पैसे वसूल करुन धमकावणाऱ्या दोन सावकारांना मुंबईत अटक
अखेर सावकारांचा त्रास असह्य झाल्याने डॉ सुनील यांनी टिळकनगर पोलीस ठाणे येथे धाव घेतली. पोलीसांनी याबाबत अनधिकृत सावकारांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.
![Mumbai : व्याजासह तिप्पट पैसे वसूल करुन धमकावणाऱ्या दोन सावकारांना मुंबईत अटक Mumbai To illegal money lenders arrested by Mumbai police Mumbai : व्याजासह तिप्पट पैसे वसूल करुन धमकावणाऱ्या दोन सावकारांना मुंबईत अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/5322cee80d23e4f9d1ae19a0b2cc4ce7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गरजू नागरिकांना दहा टक्के मासिक व्याज लावून तिप्पट पैसे उकळत धमकावणाऱ्या अनधिकृत सावकारांचा मुंबईत सुळसुळाट झाला आहे. टिळक नगर पोलिसांनी अशाच प्रकारे दोन अनधिकृत सावकारांना बेड्या ठोकल्या आहेत. हे सावकार तब्बल दहा टक्क्यांनी व्याज घेऊन तिप्पट पैसे देऊनही गरजूंना धमकावणाऱ्या आणि जीवे मारणाची धमकी देत असतं. राहुल अण्णा गुंजाळ आणि चक्रधर विप्रचरण नायक अशी अटक करण्यात आलेल्या अनधिकृत सावकाराची नावे आहेत. राहुल अण्णा गुंजाळ आणि चक्रधर विप्रचरण नायक अशी अटक करण्यात आलेल्या अनधिकृत सावकाराची नावे आहेत.
चेंबूर परिसरात रहाणारे डॉक्टर सुनील इनामदार यांनी दोन वर्षांपूर्वी काही घरगुती कारणासाठी मध्यस्थ्यामार्फत अडीच लाख रुपयाचं कर्ज व्याजाने या सावकाराकडून घेतले होते. या वेळी या सावकारांनी बॉण्ड पेपरवर त्यांच्याकडून अडीच लाख घेतले असे लिहून घेतले, परंतु एजंट फी, पहिला हप्ता असे सांगून पन्नास हजार कापून फक्त 2 लाख रुपये त्यांना दिले. त्याच बरोबर या रकमेवर दहा टक्के मासिक व्याज देखील लावत त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. एवढेच नाही तर त्यांची मोटारकार देखील त्यांनी त्यांचाकडे घेतली होती. तेव्हा पासून आरोपी हे या कारचा वापर आपल्या कामासाठी करत होते. या आरोपी सावकारांनी वाहतुकीच्या नियमाचे वारंवार उल्लघंन केले. त्यामुळे वाहतुकीच्या नियमाचे उल्लघंन केल्याप्रकरणी गाडीवर साडे नऊ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. याबाबतची नोटीस कोर्टाने सुनील यांना पाठविली होती. डॉ सुनील यांनी आतापर्यंत दहा टक्के दराने आरोपी सावकारांना साडे सहा लाख रुपये निव्वळ व्याज दिले होते.
डॉ सुनील हे जेव्हा अडीच लाख रुपये घेऊन आपली गाडी सोडून घेण्यास या सावकारांकडे गेले असता त्यांनी त्यांच्याकडे त्यांनी 5 लाख रूपयांची मागणी केली. एवढेच नाही तर पुढे ऑक्टोबर महीन्याचा 25 हजार हप्ता न दिल्याने त्यांनी डॉक्टर सुनील यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर व्याजाचे हप्त्याचे पैसे आणि त्यावर विलंब दंड असे 42 हजार 500 रूपयांची मागणी केली होती.
अखेर सावकारांचा त्रास असह्य झाल्याने डॉ सुनील यांनी टिळकनगर पोलीस ठाणे येथे धाव घेतली. पोलीसांनी याबाबत अनधिकृत सावकारांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. या सावकारांकडून अनेक कोरे सह्या असलेले बॉण्ड पेपर,चेक सापडले आहेत. त्याच बरोबर डॉ सुनील यांची कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास टिळक नगर पोलीस करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)