मुंबईला मिळणार पहिल्या महिला पोलीस आयुक्त?
रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांच्याव्यतिरिक्त रजनीश सेठ आणि के व्यंकटेशन यांची नावंही चर्चेत आहेत. हे सर्व 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.
मुंबई : मुंबई शहराला पहिल्यांदाच महिला पोलीस आयुक्त मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर 31 ऑगस्टपर्यंत मिळणार आहे. कारण सध्याचे पोलीस आयुक्त संजय बर्वे या महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांना जर सेवाविस्तार मिळाला नाही, तर राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला आणि लाचलुचपत विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची नावं मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत.
रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली, तर त्या मुंबईच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त ठरणार आहेत. रश्मी शुक्ला यांनी नागपूर आणि पुण्याचे आयुक्त म्हणून काम केलं आहे. रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांच्याव्यतिरिक्त रजनीश सेठ आणि के व्यंकटेशन यांची नावंही चर्चेत आहेत. हे सर्व 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.
संजय बर्वे यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचा आहे. 2008 मध्ये पोलीस महासंचालक पी एस पसरीचा आणि मुंबई पोलीस आयुक्त डी एन जाधव यांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवण्यात आला होता.
त्यावेळी मुंबई उच्च हा निर्णय फेटाळला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवेचे कार्यकाळ वाढवल्याचा परिणाम कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या करिअरवर पडतो, असं हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्र कुमार आणि न्यायमूर्ती पी पी देवधर याबाबत म्हटलं होतं.