एक्स्प्लोर
राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणतात...
खासदार अमोल कोल्हे यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. भेटीचा नेमका विषय काय होता, यावर तर्कवितर्क लढवले जात होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी दोघांची भेट झाली. मनसे अध्यक्षांचे आभार मानण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी भेटीनंतर दिली.
खासदार अमोल कोल्हे यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. भेटीचा नेमका विषय काय होता, यावर तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु भेटीनंतर स्वत: अमोल कोल्हे यांनीच भेटीत काय घडल्याचं सांगितलं.
राज ठाकरेंना धन्यवाद म्हटलं : अमोल कोल्हे
"लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम झाला. त्यामुळे मी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर आलो होतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्यात चर्चा झाली. विशेष म्हणजे या भेटीत राजकीय चर्चा मात्र झाली नाही," असं डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंच्या सभा
राज ठाकरे राज्यातील प्रचारादरम्यान सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. निवडणूक काळात मोदी-शाह जोडीविरोधात त्यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या. यावेळी राज यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली होती. नुसतीच टीका केली नाही तर राज यांनी सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले, ते सिद्ध करण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून राज यांनी काही पुरावेदेखील सादर केले.
सभांचा फारसा परिणाम नाही
राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा काग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी राष्ट्रवादीला रायगड, सातारा, शिरुर, बारामती या मतदारसंघात विजय मिळवता आला. तर काँग्रेसने महाराष्ट्रात केवळ चंद्रपुरातील विजय मिळवला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फारसा फायदा झाला नसल्याचं स्पष्ट झालं.
शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरुर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. अमोल कोल्हेंनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
शिरुर मतदारसंघातील एकूण 12 लाख 86 हजार 226 मतांपैकी अमोल कोल्हे यांना 6 लाख 34 हजार 108 मते (49.19 टक्के) मते मिळाली. शिवाजीराव आढळराव पाटील यांना 44.63 टक्के म्हणजे 5 लाख 75 हजार 279 मतं मिळाली. या मतदारसंघात 23 उमेदवार उभे होते. कोल्हेंनी 58 हजार 878 मतांनी आढळराव पाटलांचा पराभव केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement