(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत कोरोनाचा स्फोट, 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची नोंद
Mumbai Coronavirus Cases Today : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
Mumbai Coronavirus Cases Today : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. मागील 24 तासांत 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या 15 हजार 166 रुग्णापैकी 1218 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. इतर रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मुंबईतील सक्रीय रुग्णाची संख्या 61,923 इतकी झाली आहे. मुंबईत सध्या 30565 बेड्समधील 5104 बेड्स सध्या वापरात आहेत. मुंबईतील 462 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर 20 कंटेमेंट झोन आहेत.
देशाच्या आर्थिक राजधानीमध्येही ही रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 90 टक्केंवर आला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवसांवर आला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत आढलेल्या 15 हजार 166 रुग्णांपैकी 13 हजार 195 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणे नाहीत. मुंबईत आज 60 हजार 14 जणांची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, मुंबईत कोरोना रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा महापौर किशोरी पेडणेक यांनी दिला आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. प्रशासनाकडून निर्बंधाबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती असलेली इमारत सील करण्याबाबत मुंबई महापालिकेने सुधारीत नियमावली जाहीर केली आहे.
एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइनसाठी देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे. हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ते पाचव्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल असेही महापालिकेच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.