Mumbai Rain : मुंबईत ऊन-पावसाचा खेळ! अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ
Mumbai Unseasonal Rain : मुंबईत बुधवारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह उपनगरात काही भागात जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली.
Mumbai IMD Weather Forecast : मुंबईसह (Mumbai Rain News) राज्यात गेले काही दिवस वातावरणात (Weather Update) मोठा बदल पाहायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री हवेत गारवा (Cold Weather) जाणवत असला, तरी दुपारी मात्र कडाक्याच्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. पहाटे थंडी आणि दिवसा उकाडा असं चित्र सध्या मुंबईसह राज्यभरात आहे. मुंबईत बुधवारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह उपनगरात काही भागात जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसानं चांगलं झोडपलं. काही वेळासाठी मुंबईकरांची तारांबळ उडाली होती.
मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी
मुंबईप्रमाणे कोकणातही अवकाळी वरुण राजा बरसला. मुंबईत बुधवारी काही ठिकाणी वावटळ उठली, तर अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईसह उपनगरात बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस कोसळला. कोकण किनारपट्टीलाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार बरसल्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
पुढील दोन दिवस पावसाची शक्यता
अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असल्याने राज्यासह देशातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस केरळ, कर्नाटक, दक्षिण गोवा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
वायू प्रदूषणाचा फटका
मुंबईत एकीकडे ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत असताना दुसरीकडे वाढलेल्या वायू प्रदूषणाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. वाढलेल्या धूळ आणि धुरक्यामुळे दूरवर पाहण्याची दृश्यमानता कमी झाली आहे. मात्र आज पडलेल्या पावसामुळे धूळ आणि धुरक्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून दृश्यमानतेत वाढ झाली आहे.