(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लवकरच सीएसटी-पनवेल जलद मार्ग, मुंबई पोर्ट ट्रस्टचा जागा देण्यास होकार
या जलद मार्गावर रेल्वेने स्टेशन बांधल्यास पोर्ट आपली जागा देईल, या अटीवर पोर्टने जागा देण्यास होकार दिला आहे. रेल्वेने स्टेशन बांधल्यास पोर्ट पाहायला येणाऱ्यांसाठी ते सोयीस्कर ठरेल, अशी माहिती पोर्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.
रेल्वे विभागाने देखील पोर्टची ही अट मान्य केली आहे. पोर्टला स्थानकामुळे फायदा होत असेल तर रेल्वेला स्थानक उभारण्यासाठी काही हरकत नाही, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) व्यवस्थापकिय संचालक प्रभात सहाय यांनी दिली.
सीएसटी-पनवेल जलद मार्ग प्रकल्प
एमआरव्हीसीने या जलद मार्गाची रचना पूर्व नियोजित मार्गाच्या तुलेनत बदलली आहे. एमआरव्हीसी हा मार्ग मेंशन रोडच्या बाजूने बांधण्याचा विचार करत आहे, असं एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रस्तावित पी.डी. मेलो रोड ऐवजी या मार्गावर काम करणं अधिक सोपं जाईल, असा एमआरव्हीसीचा अंदाज आहे.
नवीन संरचनेनुसार प्रकल्पाचा आराखडा तयार झाला आहे. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 पासून या मार्गाचं काम सुरु होणार असून रे रोड ते कुर्लापर्यंत हा मार्ग भूमिगत असणार आहे. तर मानखुर्द पासून पुढे जमीनीलगत असेल. सिडकोने हा मार्ग पाम बीच रोडच्या बाजूने बांधण्याचा देखील सल्ला दिला असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सागितलं.
सीएसटी ते पनवेल या 47 किलोमीटरच्या मार्गादरम्यान एकूण 11 स्टेशन्स असून या प्रकल्पाची किंमत 15 हजार कोटी रुपये आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर हार्बर लाईनवर सध्या असलेला ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.