गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांचा 'करारनामा'! गुन्हेगारांच्या चांगल्या वर्तनासाठी करणार बाँड
कराराचे उल्लंघन केलं तर 15 हजार ते 50 लाखांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा लागू शकतो. ज्यामुळे गुन्हेगारी तर कमी होईलच मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीला ही आळा बसेल अशी अपेक्षा मुंबई पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईत गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांनी चांगले वर्तन करावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर त्या कराराचे उल्लंघन केलं तर 15 हजार ते 50 लाखांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा लागू शकतो. ज्यामुळे गुन्हेगारी तर कमी होईलच मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीला ही आळा बसेल अशी अपेक्षा मुंबई पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. लोक देशभरातून मुंबईमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात आणि रमून जातात. पण दुसरीकडे मुंबईवर गुन्हेगारांचं सुद्धा सक्रिय लक्ष असतं त्यामुळे मुंबईमध्ये घडणार्या गुन्ह्यांची संख्या देखील जास्त आहे. जे रोखण्याचं आव्हान 24 तास मुंबई पोलीसांसमोर असते आणि हे आव्हान मुंबई पोलीस यशस्वीपणे निभावतात. मात्र अजून सक्षमपणे गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवीन शक्कल लढवली आहे.
मुंबईमध्ये 94 पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 'टॉप 25' गुन्हेगारांची यादी बनवण्यात येणार आहे. या सर्व आरोपींकडून चांगले वर्तन करण्यासाठी एक करार करण्यात येणार आहे. हा करार भरल्यानंतर जर एखाद्या आरोपीने एखादा गुन्हा केला किंवा त्याचा कुठल्या गुन्ह्यात सहभाग आढळला तर त्याच्याकडून करारामध्ये दिलेली रक्कम वसूल केली जाईल. करारामध्ये 25 हजार ते 50 लाख पर्यंतची रक्कम वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम अगोदर 5 हजार होती. मात्र रक्कम कमी असल्यामुळे काही फारसा फरक पडला नाही. 94 पोलीस स्टेशनमधील 3043 गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली आहे
करारामधील रकमेची तरतूद बॉण्ड भरणाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असणार आहे. तसेच त्याची आर्थिक परिस्थितीची सुद्धा चाचणी केली जाईल. ज्यामुळे ही मोहीम नीट राबवता येईल असं विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे.येणाऱ्या दिवसात याचा किती फायदा होईल ते पाहण महत्त्वाचे असणार आहे. मात्र पोलीसांनी सुरू केलेल्या या पद्धतीने नक्कीच गुन्हेगारीवृत्तीवर तर आळा बसेलच पण गुन्हेगारी सुद्धा कमी होईल अशी सकारात्मक अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :