(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय, मुंबई पोलीस आयुक्तांचा गृहखात्याला अहवाल
तत्कालीन पोलीस सहआयुक्तांच्या विरोधानंतरही परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांची नियुक्ती केली. तसंच विविध हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास परमबीर सिंह यांच्या सांगण्यानुसार सचिन वाझेंकडे देण्यात आला होता, असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला पाठवलेल्या अहवालात नमूद केलं आहे.
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला अहवाल पाठवला असून यात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आला. तसंच तत्कालीन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी त्यांची नियुक्ती केली, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
सचिन वाझे सर्वसाधारण सहाय्यक पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते रिपोर्ट करायचे नाहीत. विविध हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास परमबीर सिंह यांच्या सांगण्यानुसार सचिन वाझेंकडे देण्यात आला होता. सचिन वाझेंच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती.
हायप्रोफाईल प्रकरणात मंत्र्यांच्या ब्रिफिंग वेळी परमबीर सिंह यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना सचिन वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, असं गृहखात्याला पाठवलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात
मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. याप्रकरणी एनआयए सचिन वाझे यांची चौकशी करत आहे. तर मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे.
परमबीर सिंह एनआयए कार्यालयात
राज्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने खळबळ उडालेली आहे. त्यातच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयए परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवणार असून यातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.