सुशांतच्या बहिणींवरील आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांचा हायकोर्टात दावा
सुशांतसिंग राजपूतच्या बहिणी प्रियंका आणि मीतू सिंह यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी करत दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टात केली आहे
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींविरोधात रियाने केलेल्या आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून आलं. तिनं केलेले आरोप हे फसवणुकीशी संबंधित आहेत ज्याचा तपास होणं गरजेचं आहे. त्यामुळे मितू आणि प्रियंका या दोघींविरोधात गुन्हा नोंदवल्याचा दावा मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. तसेच यादोघींनी मुंबई पोलिसांवर प्रतिमा मलिन केल्याचा तसेच सीबीआयच्या तपासात विघ्न आणत असल्याचे आरोप फेटाळले आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीने 7 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस स्थानकांत सुशांतच्या दोन बहिणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या बहीणी त्याच्या नकळत त्याला एनडीपीएस कायद्याने प्रतिबंधित केलेली औषध देत होत्या. त्यासाठी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रूग्णालयातील डॉ. तरूण कुमारने बनावट प्रिस्क्रिप्शन दिल्याचं रियाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सुशांतच्या प्रियंका सिंह आणि मितू सिंह या दोन्ही बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यानुसार, त्यानुसार मुंबई पोलिसांच्यावतीने वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निखिल कापसे यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावेळी सीबीआयच्या तपासाला प्रभावित करण्याचा किंवा दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळून लावला आहे. आम्ही जिवंत किंवा मृत व्यक्तीला बदनाम करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. मुळात सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल होणे आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआयनं तपास करणे या दोन्ही एकाच प्रकरणाच्या दोन बाजू असल्या तरी दोन्ही खटल्यांचे स्वरूप स्वतंत्र असल्याचं पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
दिल्लीतील रूग्णालयातील डॉक्टरांनी बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे सुशांतला औषध दिल्याचे रियाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे मानसोपचार तज्ज्ञाने रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी न करता त्याला फक्त लक्षणं सांगून प्रिस्क्रिप्शन देणे एनडीपीएस कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आरोपाचे गंभीर स्वरूप पाहता चौकशी आणि तपास होणं गरजेचं असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून मुंबई पोलिसांनी नमूद केलं आहे. त्यामुळे सुशांतसिंग राजपूतच्या बहिणी प्रियंका आणि मीतू सिंह यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी करत दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टात केली आहे. हायकोर्टात 4 नोव्हेंबरला यावर युक्तिवाद होणार आहे.