Shivsena Prabhadevi Rada : प्रभादेवी राडा: सदा सरवणकर यांचा कट्टर समर्थक ते विरोधक; महेश सावंत आहे तरी कोण?
Shivsena Prabhadevi Rada : कधीकाळी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले महेश सावंत सध्या सरवणकर यांचे विरोधक आहेत. महेश सावंत आहेत तरी कोण?
Shivsena Prabhadevi Rada : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात तणावाची स्थिती होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. मात्र, प्रभादेवीत गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात (Shivsena and Shinde Group clash) झालेल्या वादाचे रुपांतर आज मध्यरात्री हाणामारीत झाले. प्रभादेवीत राडा झाल्यानंतर विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) हे शिंदे गटाच्या निशाण्यावर असल्याचे दिसून आले. कधीकाळी आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांचे कट्टर समर्थक अशी ओळख महेश सावंत यांची होती. मात्र, सध्या ते सरवणकर यांचे कट्टर विरोधक समजले जातात. मागील मुंबई मनपा निवडणुकीत समाधान सरवणकर हे अवघ्या 250 च्या आसपास मतांनी विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार महेश सावंत होते. हे महेश सावंत आहेत तरी कोण? (Who is Mahesh Sawant)
महेश सावंत प्रभादेवीमधील जुने शिवसैनिक आहेत. प्रभादेवी, दादर, परळ हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गिरण्या जोमात असताना या कधीकाळी भागात कम्युनिस्टांचा प्रभाव होता. मात्र, कालांतराने या भागात शिवसेनेचा प्रभाव वाढला. मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांची वस्ती या भागात आहे. महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत होते. वडिलांच्या प्रभावाने महेश सावंत यांनी 1990 पासून शिवसेनेत सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. विभागात शिवसेनेचे आंदोलन, सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग असायचा. त्याच्या जोरावर महेश सावंत यांचा परिसरात चांगला जनसंपर्क तयार झाला.
सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक
सध्या शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांची प्रभादेवी भागावर पकड होती. सदा सरवणकर हे तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. वर्ष 2009 मध्ये सदा सरवणकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि नारायण राणेंच्या हाकेला ओ देत काँग्रेसचा हात पकडला. सदा सरवणकर यांच्यासोबत जी मोजकी मंडळी गेली त्यात महेश सावंत यांचाही समावेश होता. काही वर्षांनी सदा सरवणकर पुन्हा शिवसेनेत आले तेव्हा महेश सावंत देखील शिवसेनेत परतले.
सरवणकर यांचे विरोधक
सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात 2017 च्या सुमारास वितुष्ट निर्माण झाले. पक्षासाठी काम करूनही महापालिका निवडणुकीत डावलण्यात येत असल्याची सल सावंत यांच्या मनात होती. 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत सदा सरवणकर यांनी आपला मुलगा समाधान सरवणकर याची उमेदवारी पक्षाकडून मिळवली. त्यानंतर महेश सावंत यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपकडूनही त्यांना ऑफर आल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी ही ऑफर नाकारली. या महापालिका निवडणुकी दरम्यान सरवणकर आणि सावंत यांच्यात तणाव निर्माण झाला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांना 8623 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमदेवार महेश सावंत यांना 8364 मते मिळाली. या महापालिका निवडणुकीनंतर सावंत पुन्हा शिवसेनेत परतले. सदा सरवणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने सावंत यांना विभागप्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Shivsena Vs Shinde : प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; आमदार सरवणकरांचा हवेत गोळीबार?
- Shivsena: ...तर, तुम्हाला जुनी शिवसेना दाखवून देऊ; शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा इशारा