Mumbai News : वरळी सीफेसवर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याने जॉगर्स ग्रुप आक्रमक, आंदोलनाची हाक; पोलिसांना आंदोलकांचा घेराव
Mumbai News : मुंबईतील वरळी सीफेसवर भरधाव कारने उडवल्याने महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आज मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंडळींनी आंदोलनाची हाक दिली. वरळी सीफेवर पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला भरधाव वेगाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला.
Mumbai News : मुंबईतील वरळी सीफेसवर (Worli Sea Face) भरधाव कारने उडवल्याने महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आज मॉर्निंग वॉक (Morning Walk) करणाऱ्या मंडळींनी आंदोलनाची (Agitation) हाक दिली. दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) ते वरळी पोलीस स्टेशनपर्यंत (Worli Police Station) आंदोलक मोर्चा काढणार आहेत. परंतु त्याआधीच या अपघात प्रकरणी आंदोलकांना कारवाईबाबत माहिती देण्यासाठी वरळी पोलीस शिवाजी पार्क परिसरात पोहोचले. परंतु यावेळी आंदोलकांनी सुरक्षेबाबत प्रश्न विचारत पोलिसांना घेराव घातला.
टेक कंपनीच्या सीईओचा मृत्यू
वरळी सीफेवर पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्ही कारने जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. डेअरीजवळ रविवारी सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. राजलक्ष्मी रामकृष्णन असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. संबंधित महिला ही एका टेक कंपनीची सीईओ होती. शिवाय त्या फिटनेस फ्रीक असून शिवाजी पार्कमधील जॉगर्स ग्रुपच्या एक भाग होत्या, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
घरी परतत असताना अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजलक्ष्मी रामकृष्णन या दादर-माटुंगा परिसरातील रहिवासी होत्या. ही घटना घडली तेव्हा त्या सकाळी पतीसोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी वरळी सीफेसला आल्या होत्या. सकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर राजलक्ष्मी रामकृष्णन यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की, "ही धडक इतकी भीषण होती की राजलक्ष्मी रामकृष्णन या गाडीच्या बॉनेटवरुन 10 ते 15 फूट फरफटत गेल्या आणि रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळल्या अपघातात त्या कित्येक फूट हवेत उडाल्या आणि रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा
अपघातात कारचा चालक सुमेर मर्चंट (वय 23 वर्षे) हा देखील किरकोळ जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. आरोपी हा एका खासगी कंपनीत काम करतो आणि मुंबईतील ताडदेव परिसरात राहतो. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या (IPC) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात मोटार वाहन कायद्याचे कलम 184 अंतर्गत बेदरकारपणे वाहन चालवणे आणि आयपीसीच्या 304 अ अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू ओढवणे या कलमांचा समावेश आहे.
आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले : पोलीस
सुमेर मर्चंटने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितलं की, "आपल्या घरातील पार्टी आटोपून तो आणि त्याचा मित्र एका महिला सहकाऱ्याला तिच्या शिवाजी पार्कच्या घरी सोडायला जात होता तेव्हा ही घटना घडली. ब्लाईंट स्पॉट असल्याने आपल्याला ती महिला दिसली नाही. आरोपी एकतर दारुच्या नशेत असावा किंवा त्याचा डोळा लागला असावा, ज्यामुळे गाडीवरील नियंत्रणू सुटून अपघात झाला.", असा पोलिसांना संशय आहे. "आम्ही आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल सोमवारी (मार्च) अपेक्षित आहे," अशी माहिती परिमंडळ तीनचे डीसीपी अकबर पठाण यांनी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai : वरळी सीफेसवर भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत जॉगिंगला गेलेल्या महिलेचा मृत्यू