(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News : अवघ्या दीड महिन्यात 375 किमीची नालेसफाई कशी होणार? भाजप आमदार आशिष शेलारांचा सवाल
Mumbai News : अवघ्या दीड महिन्यात 375 किमीची नालेसफाई कशी होणार? भाजप आमदार आशिष शेलारांचा सवाल.
Mumbai News : दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेलं नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी 15 एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे 375 किमीचे नाले अवघ्या दीड महिन्यात कसे साफ होणार? त्यामुळे तातडीनं कामांना मंजुरी द्या, अशी मागणी करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली.
मुंबईतील नालेसफाईच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. दरवर्षी ही सुरुवात मार्च महिन्यात होते. त्यानुसार पालिका प्रशासनानं निविदा काढून 7 मार्चला स्थायी समितीत 160 कोटींचा प्रस्ताव मंजूरीसाठी आणला होता. पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. त्यानंतर पालिकेची मुदत संपली प्रशासक नियुक्ती झाली. एवढा उशिरा सुरुवात करुन कामं कशी पूर्ण होणार? जर कामं वेळेत पूर्ण झाली नाही तर मुंबईकरांना यावेळी पावसाळ्यात भयाण परिस्थितीला सामोरं जावं लागेल, अशी भीती भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्तानं 6 एप्रिल ते 14 एप्रिल हा सेवा सप्ताह साजरा केला जाणार असून या निमित्तानं मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी आणि देखरेख केली जाणार असल्याचं आमदार आशिष शेलार यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. मात्र अद्याप कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीनं काल (बुधवारी) आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांची मुख्यालयात जाऊन भेट घेतली. नियमानुसार पारदर्शक पद्धतीनं कंत्राटदार नियुक्ती करुन तत्काळ कामांना सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, "मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी फरार झाले असून 7 मार्चच्या स्थायी समितीच्या बैठकीत का प्रस्ताव राखून ठेवला? काही अंडरस्टॅडिंग बाकी होतं का? हे असले कारभारी. मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी, अशी टीका त्यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षानं पळ काढला तरी आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार, वेळेत कामं पूर्ण व्हावीत, पूर्ण गाळ काढला जाईल, भ्रष्टाचार होणार नाही, यासाठी आम्ही मुंबईकरांच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :