Mumbai News : पोलीस कर्मचाऱ्याला थोबाडीत मारुन शिवीगाळ करणाऱ्याला 4 वर्षांचा तुरुंगवास
पोलीस कर्मचाऱ्याला थोबाडीत मारुन शिवीगाळ केल्याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईत 2011 मध्ये हे प्रकरण घडलं होतं.
मुंबई : पोलीस कर्मचाऱ्याला थोबाडीत मारुन शिवीगाळ केल्याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्या व्यक्तीला दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्याला आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल. मुंबईत 2011 मध्ये हे प्रकरण घडलं होतं. अनिल घोलप असं शिक्षा झालेल्या दोषीचं नाव असून तो चेंबूरमधील रहिवासी आहे.
अनिल घोलप आणि महेश मारीमुथू यांच्यावर सायन पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार कल्पेश मोकुल यांना शिवीगाळ, थप्पड मारणे आणि मारहाण केल्याप्रकरणी खटला सुरु होता. मारीमुथू यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं, त्यामुळे त्यांच्यावरील खटला मागे घेण्यात आला होता. अनिल घोलप यांना कलम 332, 353, 323 आणि 504 अन्वये आरोपी करण्यात आलं आहे.
दोघांचं भांडण सोडवताना मोकुल यांना मारहाण
11 मे 2011 रोजी रात्री 2.30 च्या सुमारास कल्पेश मोकुल यांनी सायनमधील एका एटीएमबाहेर दोघांना भांडताना पाहिलं. त्यावेळी कल्पेश मोकुल हे सिविल ड्रेसवर होते, त्यांनी वर्दी परिधान केली नव्हता. मोकुल यांनी आपण पोलीस असल्याचं सांगून दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र घोलप आणि मारीमुथू यांनी त्यांचं काहीही न ऐकता थोबाडीत मारुन शिवीगाळ केली. त्याचवेळी मोकुल यांनी दिनकर जाधव या पोलीस कर्मचाऱ्याची मदत घेत दोघांनाही पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली, असं सरकारी वकील सचिन पाटील यांनी सांगितलं.
या संपूर्ण घटनेचे चार प्रत्यक्षदर्शी होते, असं या प्रकरणाचे तपास अधिकारी जितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. मोकुल यांच्या डाव्या कानाला कानाच्या वरील भागाला दुखापत झाली. शिवाय मोकुल यांनी कान वाजत असल्याचीही तक्रार केली होती. या घटनेनंतर त्यांना कमी ऐकू येऊ लागलं, असं डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितलं.
पोलीस कर्मचाऱ्याला थोबाडीत मारणं म्हणजे कायदा-सुव्यवस्था बिघडवणं : सरकारी वकील
बचाव पक्षाच्या वकील जया जाधव यांनी मोकुल गणवेशात नसल्याचा युक्तिवाद केला असता सरकारी वकील सचिन पाटील म्हणाले की, "मोकुल डिटेक्शन विभागात काम करत असल्याने त्यांनी गणवेशात असणं बंधनकारक नाही." ते म्हणाले की, "मोकुलने दोघांनाही आपण पोलीस असल्याचं सांगितलं होतं." पाटील यांनी युक्तिवाद केला की, "घोलप यांनी सार्वजनिक ठिकाणी सराकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्यामुळे त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. घोलपने गंभीर गुन्हा केला आहे. गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा देणं आवश्यक आहे." "महाराष्ट्र सुधारणा कायदा, 2017, पोलीस आणि डॉक्टरांसह सार्वजनिक सेवकांवरील हल्ला प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षेमध्ये वाढ केली आहे," असं सचिन पाटील यांनी सांगितलं.
2011 ते 2015 या कालावधीत राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची 17,682 प्रकरणं नोंदवली होती. समाजात शांतता राखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतात. मला वाटते की पोलीस कर्मचाऱ्याला थोबाडीत मारणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेला मारलेली चपराक आहे," असं सचिन पाटील म्हणाले.