मुंबई महापालिकेच्या नवीन गाईडलाईन्स जारी, लॉकडाऊनच्या दिवशी 'या' लोकांना प्रवास करण्यास मुभा
मुंबई महापालिकेने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लॉकडाऊनच्या दिवशी काही घटकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यात मुंबई, पुण्यात रोज विक्रमी कोरोना बाधित रुग्णसंख्येची नोंद होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यातून काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. याच संदर्भात मुंबई महापालिकेने नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
काय आहेत नवीन गाईडलाईन्स?
- वीकेंड लॉकडाऊनकाळात ज्या विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थींना स्पर्धा परीक्षासारख्या आवश्यक गोष्टीसाठी बाहेर पडायचं आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीटपाहून त्यांना प्रवासाची परवागनी देण्यात येणार आहे. सोबतचं अशा विद्यार्थ्यांसोबत त्यांच्यासोबत एका व्यक्तीलाही (पालक) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
- अन्न पदार्थ आणि इतर महत्वाच्या गोष्टींची होम डिलीव्हरी करणाऱ्या सर्व ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कंपन्या जसे की झोमेटो, स्विगी यांना सगळ्या दिवसांत 24 तास मुभा देण्यात आली आहे. वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशी हॉटेल बंद असतील मात्र होम डिलीव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली.
- वीकेंड लॉकडाऊनच्या दरम्यान रस्त्यांच्या बाजूला असलेल्या फळांच्या दुकानदारांना पार्सल सुविधा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला अशा दुकानावर उभे राहून कुठल्याही सेवेचा लाभ घेता येणार नाही.
- घरकाम करणाऱ्या महिला, स्वयंपाकी, चालक, घरकामात मदत करणारे लोक, परिचारीका, वैद्यकीय कर्मचारी, ज्येष्ठांना सेवा पुरवणाऱ्या लोकांना सकाळी सात ते रात्री 10 पर्यंत प्रवास करण्यास सवलत देण्यात आली आहे. हे मुभा सर्व दिवशी देण्यात आली आहे.
- डोळ्यांचे रुग्णालय, चष्म्यांची दुकाने, यांना राज्य सरकारच्या वेळेतचं आपलं रुग्णालय आणि आस्थापने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात आज विक्रमी 59907 कोरोना बाधित रुग्णांची वाढ
राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज 59 हजार 907 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 30 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात 322 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 56 हजार 652 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36 टक्के झाले आहे. राज्यात काल 55 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.