मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरु करणार : आदित्य ठाकरे
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये (BMC)केंब्रिज बोर्ड सुरू ( Cambridge Board ) करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray)यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये केंब्रिज बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिलीय. जगात सर्वोत्तम जे आहे ते मुंबईत देण्याचा प्रयत्न करतोय. केंब्रिज बोर्डच्या शाळाही आता मुंबई महापालिका सुरू करत आहे. महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. पालिकेच्या शाळा अपग्रेड कशा करायच्या यावर नेहमी प्रयत्न करत आलो आहोत. पालिका शाळांचे रूप बदलू लागले आहे. एसएससी बरोबरच सीबीएसई,आयसीएसई शाळा सुरू केल्या आहेत. सीबीएसई व आयसीएसई प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागली, इतका प्रतिसाद मिळाला. केंब्रिज बोर्डच्या शाळाही आता मुंबई महापालिका सुरू करत आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक शाळा सुरू करण्याचा प्रयत्न. आज यासंदर्भात सामंजस्य करार करत आहोत, असं ठाकरे यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, पुढील वर्षी जूनपासून हा अभ्यासक्रम सुरू होईल. यामध्ये मराठी हा विषय अनिर्वाय असेल, असंही ते म्हणाले. ठाकरे म्हणाले की, राज्यात कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. मुलांसाठी लस आलेली नाही. तिसरी लाट येवू नये म्हणून प्रयत्नशील आहोत. वेगळ्या प्रश्नांवर सगळी उत्तरे आहेत. जिथं उत्तर द्यायचे आहे तिथं देईन. शिक्षणात राजकारण नको असं सांगत ठाकरे म्हणाले की, जास्तीत जास्त विद्यार्थी याचा फायदा करून घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना करिअर, रिसर्चसाठी भविष्यात फायदा होईल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
ठाकरे यांनी सांगितलं की, महापालिका आपल्या शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांसारख्या इतर उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे. शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यावरही महापालिकेचा भर आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सहसाहित्यही मोफत पुरविण्यात येत आहे. या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे चालू शैक्षणिक वर्षात चार हजार विद्यार्थी संख्येसाठी दहा हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पद्धत अनुसरावी लागली हे या शाळांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
केंब्रिज हे जगातील दर्जेदार शिक्षणाचे माध्यम असल्याने त्यांच्या माध्यमातून मुंबईतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. किती शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकेल याचा येत्या दोन महिन्यात अभ्यास करून पुढील शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.