Mumbai Metro Aqua Line Rain: मुंबईतील भुयारी मेट्रोची वाताहात, प्रशासनाची मुजोरी, सत्यस्थिती दाखवण्यास मज्जाव, वरळी आचार्य अत्रे स्टेशन पाण्यात!
Mumbai Metro line 3 Aqua: मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी घुसलं, Aqua line वर मेट्रोचं दार उघडताच तळ्यात उतरल्याचा भास. पहिल्या पावसाने विकासाचं पितळ उघडं पाडलं

Mumbai Rain news Aqua Metro: नेहमीच्या शिरस्त्यापेक्षा यंदा 12 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने यावेळी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसोबत मुंबई मेट्रोचे पितळही उघडे पाडले आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुंबई मेट्रो 3 अर्थात ॲक्वा लाईन सुरु केली होती. आरे ते वरळी असा मार्ग असणारी ॲक्वा लाईन (Metro Aqua line) भुयारी मार्गाने धावते. भुयारी मेट्रो मुंबईसारख्या शहरात कितपत व्यवहार्य ठरणार, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, राज्य सरकारने भुयारी मेट्रो पूर्णपणे सुरक्षित आहे, पावसात याठिकाणी काहीच होणार नाही, असा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात अवघ्या काही तासांत भुयारी मेट्रोच्या स्थानकांची भयाण अवस्था झाली आहे. आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य अत्रे या स्थानकाची दुरावस्था झाली आहे. (Mumbai underground metro)
पावसाचे पाणी हे भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये शिरले. पाण्याचा लोंढा आत शिरल्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांच्या छतामधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. एवढेच नव्हे तर भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात पाणी शिरल्याने येथील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्यामुळे या मेट्रो स्थानकातील अनेक गोष्टी निकामी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या वस्तू भंगारात विकण्याच्या लायकीच्या झाल्या आहेत. सध्या मेट्रो प्रशासनाने अॅक्वा लाईन बंद केली आहे.
या स्थानकावर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही बाहेर हुसकावून लावण्यात आले आहे. या मेट्रो स्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे निर्माण झालेली खरी परिस्थिती समोर येऊ नये, यासाठी मेट्रोचे सुरक्षारक्षक पत्रकारांना बाहेर काढण्यासाठी दमदाटी करताना दिसले. एकीकडे पावसाळ्यात बोजवारा उडाल्यानंतर मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या कारभाराबाबत वृत्तांकन करण्याची पूर्ण मुभा असताना चकाचक विकासाचा टेंभा मिरवणाऱ्या मेट्रो प्रशासनाकडून मात्र खरी परिस्थिती दाखवण्यापासून मज्जाव का केला जात आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Metro Line: मेट्रो प्रशासनाकडून स्पष्टीकरण
मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे.मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली. खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.मेट्रो-3 चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
आणखी वाचा
मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी घुसलं, Aqua line वर मेट्रोचं दार उघडताच तळ्यात उतरल्याचा भास
मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...

























