Mumbai Rain Updates: मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
Mumbai Rain Updates: मुंबईत गेल्या काही तासांपासून पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. समुद्राला भरती.

Mumbai Rain news: मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईत पुन्हा एकदा 'ये रे माझ्या मागल्या' अशी परिस्थिती दिसून आली. मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे मोठे दावे केले होते. मात्र, पहिल्याच पावसाने मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडले पडले आहे. कारण दोन तास पाऊस पडल्यानंतर वडाळा, माटुंगा, सायन, हिंदमाता, अंधेरीतील मिलन सब वे या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले. तर मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा आणि मशीद बंदर या स्थानकांमध्येही ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत मध्य रेल्वेने अप्रत्यक्षपणे मुंबई महानगरपालिकेवर खापर फोडले. गटारांमधून बाहेर येत असणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आले, असे मध्य रेल्वेने एक्स प्लॅटफॉर्मवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मस्जिद स्थानकावर पाणी साचल्यामुळे वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाउन हार्बर लाईन सेवा काही काळा साठी स्थगित करण्यात आली होती. ही वाहतूक पुन्हा सुरु झाली असली त्याचा वेग कमी आहे. मुंबई परिसरात मुसळधार पाऊस, बीएमसी ड्रेनेज लाईन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मध्य रेल्वेच्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यामुळे आता यावर मुंबई महानगरपालिका काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून नगरसेवक नाहीत. पालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जातो. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण असल्याने मुंबईत पाणी तुंबल्याचे खापर आता सत्ताधाऱ्यांवर फोडले जाईल.
Rain Updates: आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावलं
गेल्या तीन वर्षांपासून भाजपकडून मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालवला जात आहे. आज पहिल्या पावसात मुंबई ठप्प झाली आहे. यंदा मुंबईत ज्याठिकाणी कधी पाणी तुंबले नाही, तिथेही पाणी साचल्याचे समोर आले आहे. 2021 सालापासून हिंदमाता येथे पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रकार बंद झाला होता. मात्र, यंदा हिंदमाता येथे पाणी साचले. कारण मुंबई महानगरपालिकेने वेळेवर पंपाने पाण्याचा उपसा सुरु केला नाही. भाजपमुळे मुंबईकरांना हे सहन करावे लागत आहे. भाजप पक्ष मुंबईचा इतका द्वेष का करतो?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा वेग मंदावला
ठाणे ते CSMT कडे जाणारी जलद लोकल 40 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे ते कल्याणकडे जाणारी जलद आणि धीमी लोकल 15 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची तारांबळ उडत आहे. सीएसएमटी स्थानकातील एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्या रिशेड्युल्ड करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार आहे. सीएसएमटी धुळे एक्सप्रेस देखील 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होईल.
केम्स कॉर्नर ते मुकेश चौक च्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122 ,132,135 हे पेडर रोड, कॅडबरी जंक्शन ,भुलाबाई देसाई मार्गाने 10.30 वाजल्यापासून जे. मेहता कडे जातील.
आणखी वाचा























