Metro Car Shed : सेव्ह आरेसाठी लढा देणाऱ्या एका पर्यावरणवादी कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस
Metro Car Shed : आरे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तबरेज सय्यद या 29 वर्षीय युवकाला काल तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे.
Metro Car Shed : मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) मार्गाच्या कारशेड आरे येथे बांधण्यास विरोध करुन, सेव्ह आरेसाठी (Save Aarey) लढा देणाऱ्या एका पर्यावरणवादी कार्यकर्त्याला तडीपारीची (Tadipaar) नोटीस बजावण्यात आली आहे. आरे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तबरेज सय्यद या 29 वर्षीय युवकाला काल (9 नोव्हेंबर) तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे.
तबरेज सय्यद यांना मुंबई शहर, उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त कालावधीसाठी हद्दपार करण्याचे या नोटिशीत प्रस्तावित करण्यात आलं आहे. पोलिसांनी तबरेज सय्यद यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून, तुमच्याविरोधात तडीपारीची कारवाई का करण्यात येऊ नये? असा सवाल केला आहे. यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी तबरेज यांना 11 नोव्हेंबर रोजी साकीनाकाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.
तबरेज सय्यद यांच्याविरोधात एकूण पाच गुन्हे असून, आरे पोलीस ठाण्यात तीन, तर पवई पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे.
मला घाबरवण्याचा प्रयत्न : तबरेज सय्यद
"मी आरे वाचवण्यासाठी दर रविवारी आंदोलनासाठी येतो. त्यात मागील रविवारी मी एकटाच उभा होतो. मी आरे वाचवा मोहिमेसाठी ठामपणे उभा असल्याने माझ्याविरोधात ही कारवाई होत आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे,' अशी प्रतिक्रिया तबरेज सय्यद यांनी तडीपारीची नोटीस मिळाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.
MMRCL चा यू टर्न, आरे कारशेड परिसरातील 84 झाडं कापण्याची परवनागी देण्याची मागणी
दरम्यान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एमएमआरसीएलने (MMRCL) यू-टर्न घेतला असून मेट्रो-3 आरे कारशेड परिसरातील 84 झाडं कापण्यासाठी परवानगी मागितली आहे. 7 ऑक्टोबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात गरजेनुसार आवश्यक असलेली झाडं तोडली आहेत, असं एमएमआरसीएलने सांगितलं होतं. मात्र आता एमएमआरसीएलने मागे हटत 84 झाडे तोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर झाडं तोडली जात असल्याचा आरोप पर्यावरणाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता.सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिका प्रलंबित आहे. आरेमध्ये मेट्रो-3 कारशेड बांधण्यासाठी 33 हेक्टरचा भूखंड निश्चित करण्यात आला आहे. संपूर्ण मेट्रो-3 प्रकल्प जून 2024 पर्यंत सुरु करण्याचे नियोजन आहे.
संबंधित बातमी