(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्रालयाच्या बाहेर सुरक्षेचा नवा उपाय; गेटवर पाण्याचे टब, बादल्या भरुन ठेवल्या
Mumbai Mantralaya Security Update : वेगवेगळ्या विषयांवरुन होत असलेली आंदोलनं आणि मुंबईतील मंत्रालयासमोर होणारी निदर्शनं वाढली आहेत.
Mumbai Mantralaya Security Update : वेगवेगळ्या विषयांवरुन होत असलेली आंदोलनं आणि मुंबईतील मंत्रालयासमोर होणारी निदर्शनं वाढली आहेत. मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळं मंत्रालयाच्या बाहेर विविध प्रकारची सुरक्षा वाढवली आहे. अनेक आंदोलक मंत्रालयाच्या गेटवरती येउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याने ही सुरक्षा वाढवली असल्याचं बोललं जात आहे.
मंत्रालयाच्या गेटवर आता भरलेल्या पाण्याचे बॅरल, फायर ब्लॅंकेट आणि इतर उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. अनेकदा आंदोलन मंत्रालयाच्या गेटवर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतात. जर कोणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर तात्काळ आग विझवण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं अजूनही आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. याचा वाढता धोका लक्षात घेता सुरक्षा वाढवली असल्याचं सांगितलं आहे.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काही आंदोलक महिला एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलक महिलांना रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला होता. ऑगस्ट महिन्या देखील एका शेतकऱ्यानं मंत्रालयाबाहेर विष घेतलं होतं. त्या शेतकऱ्याचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
आपल्या वेगवेगळ्या मागण्या किंवा कामं घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकं मंत्रालयात येतात. मात्र आपली कामं किंवा मागण्या पूर्ण न झाल्यास हताश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. मंत्रालयाच्या आतमध्ये देखील काही वर्षांपूर्वी तरुणाने उडी मारली होती तर दुसऱ्या एका घटनेत उडी मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मंत्रालयाच्या आत मुख्य गाभाऱ्यात संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे. सोबतच मंत्रालयाच्या बाहेर देखील 24 तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
संबंधित बातम्या
ST Workers Strike : महिला आंदोलकांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला