ST Workers Strike : महिला आंदोलकांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला
ST Workers Strike :राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे.महिला एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
ST Workers Strike : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. आज आंदोलक आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अजूनही तोडगा निघत नाही त्यामुळे आज तीन ते चार महिला एसटी कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलक महिलांना रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आंदोलकांची एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा अशी मागणी आहे.
ST Workers Strike Live : ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस, वाचा प्रत्येक अपडेट
कुटुंबासह आंदोलनात सहभाग
मागील 8 दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आता या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना देखील आझाद मैदानात आणून कुटुंबासह आंदोलनात सहभाग घेतला आहे.
कोल्हापुरात बसस्थानक परिसरात सत्यनारायण पूजा
आज कोल्हापूर विभागातील आंदोलक कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सत्यनारायण पूजा मांडून आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. जागरण गोंधळ, भजन, किर्तन यानंतर आता सत्यनारायण पूजा घालत या कर्मचाऱ्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केलं. योग्य निर्णय घेण्याची सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी सत्यनारायण पूजा असल्याचे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आलं.
परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु
एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 8 दिवसांपासून कामबंद आंदोलन करताहेत. मागील 8 दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापलेत. त्यात काल परिवहनमंत्र्यांनी संप मागे घ्या, निलंबन मागे घेऊ असा शब्द दिलाय. तरी, संप अजूनही मागे घेतलेला नाही. त्यात आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांशी चर्चा होणार आहे. थोड्याच वेळात बैठक घेऊन आंदोलक नेते पुढची भूमिका ठरवणार आहेत.