(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Mahim Accident: मुंबईत धुळवडीला गालबोट, माहीमच्या समुद्रकिनारी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह हाती, पाचपैकी दौघांचा मृत्यू
Mumbai Mahim Accident: धुळवडीच्या दिवशी संघ्याकाळी माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर 5 मुलं रंग खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्राला भरती होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्राच्या पाण्यात पाचही मुलं बुडाली.
Mumbai Mahim Accident News : मुंबई : मुंबईतील (Mumbai News) माहीमच्या समुद्रकिनारी (Mahim Chowpatty) बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी धुळवड (Holi 2024) साजरी करण्यासाठी गेलेले पाच जण समुद्राला भरती आल्यानं पाण्यात बुडाले होते. यावेळी लाईफ गार्डनी 4 तरुणांना वाचवत हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल केलं होतं. त्यातील एकाचा उपचारा दरम्यान काल मृत्यू झाला. तर पाचव्या बेपत्ता तरुणाचा काल संध्याकाळपासून शोध सुरु होता. मात्र, रात्री समुद्रात भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं, त्यानंतर आज सकाळी सर्च ऑपरेश दरम्यान, त्याचाही मृतदेह हाती लागला आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. तर तीनजण सुखरुप बचावले आहेत.
धुळवडीच्या दिवशी संघ्याकाळी माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर 5 मुलं रंग खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्राला भरती होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्राच्या पाण्यात पाचही मुलं बुडाली. त्यापैकी चौघांना वाचवण्यात यश आलं होतं. तर एकजण बेपत्ता होता. वाचवण्यात आलेल्या चौघांना हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. चौघांपैकी दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं. इतर दोघांवर उपचार सुरू होते. मात्र, त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बेपत्ता मुलाचा शोध सुरू होता.
रात्री समुद्राला भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. मात्र, सकाळपासून पुन्हा मुलाचा शोध घेण्यासाठी माहिमच्या समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला. ही पाचही मुलं माहीममध्येच राहणारी असून सर्व 20 ते 21 वर्षांचे आहेत. पाचही जण कॉलेजमध्ये शिकतायत.
नेमकं काय घडलं?
संपूर्ण देशभरात प्रचंड उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. मुंबईतही ठिकठिकाणी जल्लोषात धुळवड खेळण्यात आली. अशातच मुंबईतील माहिम परिसरात राहणारे 5 तरुण जवळच असलेल्या प्रसिद्ध माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर धुळवड खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्राला भरती होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं रंग खेळता खेळता पाचही तरुण पाण्यात बुडाले. जवळच असलेल्या इतर लोकांना तरुण बुडाल्याची माहिती लाईफ गार्ड्सना दिली. लाईफ गार्ड्सनी तात्काळ बचावकार्य सुरू करत पाचपैकी चार तरुणांना वाचवलं. पण एकजण बेपत्ता होता. रात्री समुद्राला भरती असल्यामुळे सर्चऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. आज सकाळी पुन्हा बेपत्ता तरुणाचा शोध सुरू करण्यात आला होता. अखेर सर्च ऑपरेशन दरम्यान तरुणाचा मृतदेह हाती लागला.