72 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकला सुरुवात, प्रवाशांचे मेगा हाल मात्र ब्लॉक नंतर प्रवास होईल सुखकार
Mumbai Locals Block : मध्य रेल्वे आणि मुंबई रेल विकास कॉपोरेशन निर्माण करत असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचा शेवटचा मेगाब्लॉक सध्या घेण्यात येत आहे.
Mumbai Locals Block : मध्य रेल्वे आणि मुंबई रेल विकास कॉपोरेशन निर्माण करत असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचा शेवटचा मेगाब्लॉक सध्या घेण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक 72 तासांचा असून तो शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून सुरू झालेला असून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या मेगाब्लॉक च्या कामामुळे तीन दिवस प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत. मात्र त्यानंतर पाचवी आणि सहावी मार्गीका अस्तित्वात येईल, ज्यामुळे मध्य रेल्वेला त्यांच्या वेळापत्रकात लोकलच्या फेऱ्या वाढवता येतील. लोकलच्या फेऱ्या वाढल्यामुळे कर्जत, कसारा, कल्याण, टिटवाळा, डोंबिवली अशा स्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना त्याचा खूप मोठा फायदा होईल.
ठाणे ते दिवा स्थानकाच्या दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून जम्बो मेगाब्लॉक चे काम सुरू करण्यात आले आहे. या ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्थानकाच्या जवळ नवीन मार्गीकेचे काम करण्यात येईल. तसेच दिवा स्थानकात देखील पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेसाठी कट अँड कनेक्शन, सिग्नालींग, ओवरहेड वायर आणि टेलिकम्युनिकेशनचे काम करण्यात येत आहे. मात्र हे काम खूप मोठे असल्याने त्यासाठी तब्बल 72 तास लागणार आहेत. सहा तारखेला रात्री बारा वाजता हा मेगाब्लॉक संपुष्टात येईल, त्यानंतर सात तारखेपासून पाचवी आणि सहावी मागिका वेगळी होईल आणि त्यावरून नियोजित केल्याप्रमाणे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक करण्यात येईल. शनिवारी रात्रीपर्यंत ठाणे स्थानकाच्या जवळील कट अँड कनेक्शनची काम जवळजवळ पूर्ण करण्यात आले असून, दिवा स्थानकातील काम सध्या जलद गतीने सुरू आहे.
हे काम पूर्ण करणे म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. त्यासाठी दिवसा अंदाजे पाचशे आणि रात्री अंदाजे पाचशे कामगार मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनचे अधिकारी आणि कर्मचारी देखील दिवस रात्र दिवा आणि ठाणे स्थानकात तळ ठोकून आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी सोळा अवजड यांत्रिकी वाहनांचा उपयोग करण्यात येत असून, त्यामध्ये टॉवर व्हेगन, युनीमॅट मशीन, डीजीएस मशीन अशा वेगवेगळ्या वाहनांचा समावेश आहे. हे काम सुरू असतानाच अप आणि डाऊन धीमी मार्गिका तसेच डाऊन जलद मार्गिका सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेसच्या बाजूलाच संपूर्ण सावधानता बाळगून सुरक्षित रित्या हे मेगा ब्लॉकचे काम करण्यात येत आहे.
तीन दिवस जम्बो मेगाब्लॉक असल्यामुळे निश्चितच प्रवाशांचे देखील मेगाहाल झाले आहेत. या जम्बो मेगाब्लॉक च्या दरम्यान 350 हून जास्त लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना भरगच्च अशा लोकलमधून प्रवास करावा लागत आहे. तसेच लोकलचे वेळापत्रक कोलमडले असल्याने त्याचा देखील फटका प्रवाशांना बसत आहे. सध्या सर्व लोकल केवळ धीम्या मार्गीके वरून चालवण्यात येत आहेत. आज सकाळीच कळवा स्थानकातून अनेक प्रवासी हे चालत ठाणे स्थानकापर्यंत येताना दिसून आले. कारण कळवा स्थानकात येणाऱ्या सर्व गाड्या या खचाखच प्रवाशांनी भरल्या होत्या. शेवटी पर्याय नसल्याने या प्रवाशांना रुळांवरून चालत ठाणे स्टेशन गाठावे लागले.
दुसरीकडे 100 पेक्षा जास्त लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्याने मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना देखील या जम्बो मेगा ब्लॉकचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी, तेजस, एसी डबल डेकर अशा गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आले असून, इतर गाड्या पनवेल स्थानकातून चालवण्यात येत आहेत. तसेच पुणे, नागपूर, अमरावती, नांदेड, मनमाड, नाशिक या शहरांना जोडणाऱ्या गाड्या देखील रद्द करण्यात आलेले आहेत.
बहात्तर तासांचा हा मेगाब्लॉक संपल्यानंतर मात्र याच सर्व प्रवाशांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. कारण एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक वेगळ्या मार्गिकेवरून होणार असल्याकारणाने मध्य रेल्वेला वेळापत्रकात बदल करून 100 पेक्षा जास्त लोकलच्या फेऱ्या वाढवता येतील. त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी लोकलमध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल.