Mumbai Local : परप्रांतीय प्रवाशांवर निर्बंध नाहीत, मग लोकल प्रवाशांवर का?
मुंबईत जरी लोकल प्रवासावर निर्बंध असले तरी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि देशाच्या कोणत्याही राज्यातून प्रवासी रेल्वेनं मुंबईत दाखल होऊ शकतात.
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा अजूनही देण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे अनेक राज्यातून हजारो प्रवासी रोज मुंबईत दाखल होत आहेत. या प्रवाशांची चाचणी होणं अपेक्षित असले तरी, रेल्वे स्थानकांवर ही चाचणी होत नाही. मग मुंबई आणि आसपासच्या शहरात लाखो लोकांचं लसीकरण झालं असूनही त्यांना प्रवासाची मुभा का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबईत जरी लोकल प्रवासावर निर्बंध असले तरी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि देशाच्या कोणत्याही राज्यातून प्रवासी रेल्वेनं मुंबईत दाखल होऊ शकतात. अशा सर्व प्रवाशांची रेल्वेस्थानकांवर चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र गेले काही दिवस या चाचण्या होत नाहीत. त्यामुळे त्यांना covid-19 ची लागण झाली आहे की, नाही हे देखील समजू शकत नाही. तरीही या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारनं आणलेले नाहीत. पण दुसरीकडे मुंबईत आणि आसपासच्या महानगरांमध्ये लाखो नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करु द्या, असं टास्क फोर्सनं देखील सांगितलं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये जाण्यावर बंदीच आहे. हा दुजाभाव सरकार का करतंय? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विचारला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास केला जाऊ शकतो. तर आम्हाला देखील लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.
आकडेवारी काय सांगते?
मध्य पश्चिम आणि कोकण अशा तीन वेगवेगळ्या मार्गांवरून परराज्यातील प्रवासी मुंबईत येतात.
यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गाड्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
मध्य रेल्वेवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, कोलकत्ता तसेच दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा राज्यातून दररोज प्रवासी येत असतात. त्यांची संख्या दर दिवशी अंदाजे 30 ते 35 हजार इतकी आहे.
पश्चिम रेल्वेवर गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा अशा वेगवेगळ्या राज्यातून दररोज रेल्वे येतात. पश्चिम रेल्वेवरील दररोजच्या परप्रांतीय प्रवाशांची संख्या अंदाजे 20 ते 25 हजार इतकी आहे.
कोकण रेल्वे वरून मुख्यतः कोकणातील आणि गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यातून प्रवासी येत असतात.