Mumbai Local : सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक; मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं
Mumbai BJP Protest : लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्या, या मागणीसाठी भाजपकडून मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली.

Mumbai BJP Protest : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्या, या मागणीसाठी भाजपकडून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. चर्चगेट रेल्वे स्टेशनबाहेर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषबाजी करण्यात आली. तर, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी, भाजपच्या काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं. चर्चगेट, दहिसर, घाटकोपर या ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली.
चर्चगेट स्टेशन बाहेर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तर कांदिवलीमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. घाटकोपरमध्ये भाजप कार्यकर्ते स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी अडवले. घाटकोपरमध्ये भाजपच्या वतीने लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी भाजप कार्यकर्ते विना तिकीट प्रवास करुन आंदोलन करणार असल्याचं समजातच कार्यकर्ते स्टेशनवर जाऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करावी या मागणीसाठी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. चर्चगेट स्थानकावरुन प्रवीण दरेकर यांनी लोकल ट्रेननं प्रवास करण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकलमध्ये बसले. पण अचानक ती लोकल कारशेडमध्ये पाठवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्या लोकलचे पंखे आणि लाईट बंद करण्यात आले. दरम्यान, लोकलसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना यावेळी चर्चगेट ते चर्नी रोड स्टेशनपर्यंत विनातिकीट प्रवास केला. यावेळी टीसीनं प्रवीण दरेकरांना 260 रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, "मला 260 रुपयांचा दंड ठोठावला आहे. मी टीसीकडे तिकीटाची मागणी केली. तर लोकल ट्रेन सेवा अद्याप सुरु झालेली नाही, असं मला टीसी म्हणाला."
परप्रांतीय प्रवाशांवर निर्बंध नाहीत, मग लोकल प्रवाशांवर का?
सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा अजूनही देण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे अनेक राज्यातून हजारो प्रवासी रोज मुंबईत दाखल होत आहेत. या प्रवाशांची चाचणी होणं अपेक्षित असले तरी, रेल्वे स्थानकांवर ही चाचणी होत नाही. मग मुंबई आणि आसपासच्या शहरात लाखो लोकांचं लसीकरण झालं असूनही त्यांना प्रवासाची मुभा का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबईत जरी लोकल प्रवासावर निर्बंध असले तरी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि देशाच्या कोणत्याही राज्यातून प्रवासी रेल्वेनं मुंबईत दाखल होऊ शकतात. अशा सर्व प्रवाशांची रेल्वेस्थानकांवर चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र गेले काही दिवस या चाचण्या होत नाहीत. त्यामुळे त्यांना covid-19 ची लागण झाली आहे की, नाही हे देखील समजू शकत नाही. तरीही या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारनं आणलेले नाहीत. पण दुसरीकडे मुंबईत आणि आसपासच्या महानगरांमध्ये लाखो नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करु द्या, असं टास्क फोर्सनं देखील सांगितलं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये जाण्यावर बंदीच आहे. हा दुजाभाव सरकार का करतंय? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विचारला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास केला जाऊ शकतो. तर आम्हाला देखील लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.
मुंबई लोकल प्रवासाबाबत काहीतरी सकारात्मक तोडगा काढा : हायकोर्ट
मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रवेशाबातत राज्य सरकार काहीतरी सकारात्मक तोडगा काढेल आणि येत्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं लोकांना स्वातंत्र्य मिळेल अशी अपेक्षा हायकोर्टानं गुरूवारी व्यक्त केली. तसेच अद्याप पत्रकारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वेनं प्रवासाची मुभा का दिलेली नाही? असा सवालही राज्य सरकारला विचारला. पुढील गुरुवारपर्यंत यासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी हायकोर्टानं तहकूब केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
