(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local : मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवेला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदिल
Mumbai Local : 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदिल देण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदिल देण्यात आला आहे. या संदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझ्या प्रिय मुंबईकरांनो, आपल्या सुविधेसाठी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्य लोकांसाठी लोकल सेवा दिवसाची पहली ट्रेन सुरु झाल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री 9 वाजेपासून शेवटच्या लोकलपर्यंत सुरु करण्यात आली आहे, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार सकाळी 7 ते 12, तसेच सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई लोकल ट्रेन केवळ आवश्यक सेवामधील कर्मचाऱ्यांसाठीच चालवल्या जाणार आहेत. या वेळेत सामान्य लोकांसाठी लोकल प्रवासाची परवानगी नसेल. आपल्याला आवाहन आहे की प्रवासादरम्यान आपण कोरोनासंबंधील सर्व नियमांचं पालन करावं, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
मेरे प्यारे मुंबई वासियों, आप सभी की सुविधा के लिये, 1 फरवरी से मुंबई लोकल ट्रेन, दिन की अपनी पहली सेवा के शुरु होने से सुबह 7:00 बजे तक, तथा दोपहर 12:00 बजे से 4:00 बजे तक, और उसके बाद रात्रि 9:00 बजे से ट्रेन सेवाओं के समाप्त होने तक शुरु की जा रही हैं।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) January 29, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवेला परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये आणि आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वांना सोयीचं होईल, असं आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
Mumbai Local | सरसकट सर्वांसाठी मुंबई लोकल सेवा सुरु करा; भाजपची मागणी
विशिष्ट वेळेतच सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही आणि आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते.