(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 20 दिवसांचा पाणी साठा; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे...
Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water) करणाऱ्या धरणांमध्ये फक्त पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा राहिला आहे. मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 11.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेकडून सरकारला अतिरिक्त पाण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे. पाऊस लांबणीवर पडल्यास मुंबईला पाणीबाणीला (Mumbai Water Cut) तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा कमी झाल्याने महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईला मुबलक प्रमाणात पाणी मिळावं यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी मुंबईसाठी द्यावे अशी विनंती केली होती. सध्याचा पाणी साठा पाहता पाटबंधारे विभाग/राज्य सरकार यांनी राखीव साठ्यातून पाणीसाठा मुंबईसाठी मंजूर केला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना जपून पाणी वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय जून महिन्यात योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास राज्य सरकारकडून मिळणाऱ्या शिल्लक पाणी साठ्यातून मुंबईची तहान भागवावी लागणार आहे.
मध्य वैतरणा, वैतरणा, भातसा, मोडक सागर आणि तानसा या धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, आता धरणातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे मुंबईसमोर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणी टंचाईची झळ?
मान्सून महाराष्ट्रासह देशात दाखल व्हायला अवकाश आहे. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबई आणि परिसर मात्र कोरडाठाक आहे. त्यात आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याच्या बातमीने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. पाऊस आणखी रखडल्यास जून महिन्यात मुंबईला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
राज्यातील पाणीसाठ्यातही घट
दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने चिंतेत आणखीच भर पडली आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.