एक्स्प्लोर
बारावी गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी मुंबईत दोन विद्यार्थी ताब्यात

मुंबई : बारावी गणित विषयाचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याप्रकरणी मुंबईत दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सोमवारी बारावी गणिताचा पेपर परीक्षेपूर्वी 30 मिनिटांपूर्वी व्हायरल झाला होता. 'हिंदुस्तान टाइम्स'ने हे वृत्त दिलं आहे. हे दोन्ही विद्यार्थी सोमवारी परीक्षा केंद्राबाहेर मोबाईल फोनवर व्हायरल झालेल्या पेपरचा फोटो पाहाताना दिसले. त्यानंतर चौकशीसाठी त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. मात्र हा प्रकार पेपर फुटीचा नाही, कारण तो पेपर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले. गणित आणि संख्याशास्त्राचा पेपर सकाळी 10.30 वाजता विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर शेअर झाला होता. मात्र पर्यवेक्षकांनी 10.50 वाजता परीक्षार्थींनी पेपर दिला आणि 11 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. याचाच अर्थ पेपरवर नजर टाकण्यासाठी विद्यार्थ्यांकडे वेळ होता. व्हॉट्सअॅपवर पेपर कधी व्हायरल झाले? 2 मार्च - मराठी 3 मार्चला - राज्यशास्त्र 4 मार्चला - सेक्रेटरिअल प्रॅक्टिस, भौतिकशास्त्र 6 मार्चला - गणित, संख्याशास्त्र ज्या अर्थी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यावरुन परीक्षार्थींना फुटलेला पेपर मोबाईलवर पाहण्याची आणि त्यावर नजर टाकण्याची संधी होती. वांद्रे आणि मालाडमधील कॉलेजमधील विद्यार्थी ताब्यात घेतलेल्या दोघांमध्ये एका मुलीचा समावेश आहे. मालाडमधील पीडी तुराखिया ज्युनिअर कॉलेजबाहेर ही विद्यार्थिनी मोबाईलवर व्हायरल झालेला फोटो पाहत होती. तर वांद्र्यातील एमएमके कॉलेजच्या आवारात इतर विद्यार्थ्यांना फोटो दाखवत असताना एका विद्यार्थ्याला पकडलं. कुरार पोलिसांनी संबंधित विद्यार्थिनीवर परीक्षेतील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 1982 तसंच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना 10.45 च्या सुमारास मोबाईल फोन चेक करत असल्याचं पाहिलं होतं. परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोनमध्ये डोकावणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत. परीक्षेची परवानगी, मात्र नंतर कारवाई बोर्डाच्या सूचनेनुसार दोन्ही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली असून त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. "अशा प्रकारांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची परवानगी देतो. त्यानंतर कारवाई केली जाते. ही कारवाई तपासावर अवलंबून असते. जर ते दोषी असतील तर त्यांना परीक्षेचा निकाल मिळणार नाही," असं बोर्डाचे विभागीय सचिव सिद्धेश्वर चांदेकर यांनी सांगितलं. "फोटो नेमका कुठून आणि कसा व्हायरल झाला हे विद्यार्थ्यांच्या चौकशीतून समोर येईल," असा विश्वास बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संबंधित बातम्या बारावीचा सलग तिसरा पेपर लीक, गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरफुटी प्रकरणी चौघे अटकेत लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला बारावीची प्रश्नपत्रिका नवी मुंबईत वेळेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर
आणखी वाचा























