एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'नवरा रात्री उशिरा घरी येतो', हे पत्नीच्या आत्महत्येसाठीचं कारण होऊ शकत नाही : हायकोर्ट
नवरा बायकोमध्ये अशा वादाच्या गोष्टी नेहमीच घडत असतात. पण त्यामुळे एखाद्यावर क्रूर हिंसेचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. एखादी शारिरीक हिंसा किंवा सासरच्या लोकांनी केलेल्या बेकायदेशीर मागण्यांच्या आरोपांबाबत पुरेसा पुरावा अभियोग पक्षाने दाखल करायला हवा
मुंबई : नवरा रात्री उशिरा घरी येतो किंवा रोज बाहेर जेवतो म्हणून त्याने बायकोचा क्रूर छळ केला असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच हे काही पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं सबळ कारणही नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका कौटुंबिक प्रकरणात देत आरोपी पतीची तब्बल 24 वर्षांनी याप्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे.
एका महिलेनं नवऱ्याच्या आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील आरोपी पतीनं दोषमुक्तीसाठी हायकोर्टात याचिका केली होती. या व्यक्तीवर पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला होता. सप्टेंबर 1995 मध्ये आपल्या सासरच्या घरी आत्महत्या केली होती. तिच्या आई-वडिलांनी या आत्महत्येसाठी तिचा पती जबाबदार असल्याचा आरोप करत पोलिसांत फिर्याद नोंदविली. मात्र ही तक्रार खोटी असून ती रद्द करण्यासाठी पतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती के. श्रीराम यांच्यापुढे सुनावणी झाली. पतीच्यावतीने करण्यात आलेल्या युक्तिवादात स्पष्ट करण्यात आले की, पत्नी मूल होत नसल्यामुळे ती दुःखी झाली होती आणि त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. लग्नानंतर सात-आठ वर्ष झाल्यावरही मुल न झाल्यामुळे ती नाखूश होती.
नवरा रात्री घरी उशिरा येतो आणि घरी न जेवता बाहेरुनच जेवून येतो, अशा तक्रारी मुलगी नेहमी करीत असे. तसेच तिला मूल होत नसल्यामुळेही तिचा सासरच्या लोकांकडून तिचा छळ केला जात होता. त्यातूनच निर्माण झालेल्या मानसिक तणावातून तिने आत्महत्या केली असा दावा करण्यात मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा हायकोर्टानं अमान्य केला. नवरा बायकोमध्ये अशा वादाच्या गोष्टी नेहमीच घडत असतात. पण त्यामुळे एखाद्यावर क्रूर हिंसेचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. एखादी शारिरीक हिंसा किंवा सासरच्या लोकांनी केलेल्या बेकायदेशीर मागण्यांच्या आरोपांबाबत पुरेसा पुरावा अभियोग पक्षाने दाखल करायला हवा ज्यामुळे पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं हे सिद्ध होऊ शकेल, असे निरीक्षण याप्रकरणी हायकोर्टानं नोंदवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement