Mumabi Vaitarna Lake: आनंदाची बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाच तलाव भरले, सर्व धरणांमध्ये एकूण 89.10 टक्के जलसाठा
यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' (Vaitarna dam) आज मध्यरात्री 2 वाजून 45 मिनिटांनी पूर्ण भरले आहे. ज्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून 706.30 क्युसेक या वेगाने जलविसर्ग सुरू आहे.
गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज मध्यरात्र भरलेल्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 193, 530 दशलक्ष लिटर (19353 कोटी लीटर) इतकी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात102.4 मीटर उंचीचे आणि 565 मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण 2014 मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' असे करण्यात आले आहे.
89.10 टक्के इतका जलसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे 6 वाजताच्या मोजणीनुसार सर्व 7 तलावांमध्ये मिळून 89.10 टक्के इतका जलसाठा आहे.
मुंबईत पाणीकपात
यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. जुलै महिन्यात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पवई तलाव भरला होता. त्यानंतर आता तुळशी तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.
हे ही वाचा :
मुंबईला पुरविले जाणारे पाणी निर्जंतुकीकरण केलेले, BMC प्रशासनाचे स्पष्टीकरण