हाताला थुंकी लावून हस्तांदोलनाचा टिक टॉक व्हिडीओ, मुंबईत दोघांवर गुन्हा
एका महिलेने कानशीलात मारल्यावर, त्याने आणि त्याच्या मित्राने हाताला थुंकी लावून, तिच्याशी हस्तांदोलन केलं, असं चित्रण या टिक टॉक व्हिडीओमध्ये आहे.
मुंबई : एकीकडे संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरोधात एकवटलेला असताना काही जण टिक टॉकच्या माध्यमातून मूर्खपण करत आहेत. टिक टॉकवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणं दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईजवळच्या मिरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादीफ खान आणि इरफान असं दोघांची नावे आहेत. हा व्हिडीओ सादीफ खानच्या टिक टॉकच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला होता.
एका महिलेने कानशीलात मारल्यावर, त्याने आणि त्याच्या मित्राने हाताला थुंकी लावून, तिच्याशी हस्तांदोलन केलं, असं चित्रण या टिक टॉक व्हिडीओमध्ये आहे. हा व्हिडीओ सगळीकडे शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटला होता.
टिकटॉक अकाउंट बंद करण्याचे आदेश देण्याचा अधिकार पोलिसांना नाही : हायकोर्ट
याची दखल घेत नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण यांनी स्वत:च तक्रारदार होऊन, या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या दोघांवर भारतीय साथ रोग नियंत्रण कायदा तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अटक झाल्यानंतर दोघांचीही जामिनावर सुटका झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते. तीन व्यक्तींनी मिळून एक आणि एका व्यक्तीने एक असे दोन टिक टॉक व्हिडीओ होते. ज्यात नोटांना थुंकी लावून किंवा नोटांनीच नाक पुसून कोरोना कसा पसरवला जाऊ शकतो, असा संदेशच एकप्रकारे देण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत मालेगाव पोलिसांनी चौघांना अटक केली होती.
कोरोनाची लागण झालेला व्यक्ती शिंकला किंवा खोकला की त्याच्या नाका-तोंडातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्समुळे त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना व्हायरसचा संसर्ग होतो. त्यामुळे मास्क, ग्लोव्ज वापरा, हात सतत धुवा अशा सूचना केल्या जात आहेत. परंतु काही महाभाग ही गोष्ट गांभीर्याने न घेता त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
Tik-Tok maker Arrested | नोटांना नाक पुसून घृणास्पद टिकटॉक बनवणाऱ्याला बेड्या, चौघांना अटक