तुमचं मुलं केस खातं? वेळीच लक्ष द्या, मुंबईत 10 वर्षीच्या मुलीच्या पोटातून काढला 50 सेमी लांबीचा केसांचा गुंता
Mumbai News: परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमधील डॉक्टरांना एका 10 वर्षीय मुलीच्या पोटातून तब्बल 50 सेमी लांबीचा केसांचा गुंता काढण्यात यश आले आहे. या 10 वर्षांच्या चिमुरडीवरती गॅस्ट्रोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मुंबई: घरात असलेली लहान मुलं जे काही मिळेल ते तोंडात घालतात. पण, एका 10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून चक्क केसांचा गुंता (hairball) निघाला आहे. परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमधील डॉक्टरांना एका 10 वर्षीय मुलीच्या पोटातून तब्बल 50 सेमी लांबीचा केसांचा गुंता काढण्यात यश आले आहे. या 10 वर्षांच्या चिमुरडीवरती गॅस्ट्रोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम नावाचा दुर्मिळ विकार झाल्याचे आढळून आले होते. ही स्थिती पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. 10 पैकी सुमारे 8 प्रकरणांमध्ये ही समस्या लहान मुले, किशोरवयीन मुली आणि 30 वर्षांखालील तरुणींमध्ये दिसून येते. (Mumbai doctors remove 50-cm hairball from 10-year-old girls stomach)
वसई मधील 10 वर्षीय शाळकरी मुलीच्या 15-20 दिवसांपासून पोटात दुखत होतं, तिला अस्वस्थता आणि उलट्या होत होत्या. तिच्या आई-वडीलांनी तिला जवळच्या परिसरातील काही डॉक्टरांना दाखवलं, परंतु निदान होऊ शकलं नाही. मुलीच्या पालकांनी तिला बाई जेरबाई वाडीया हाँस्पिटल फाँर चिल्ड्रेन मधील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. मुलीला बद्धकोष्ठता, कुपोषण, वजन कमी होणं आणि 4-5 दिवसांपासून ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्याची लक्षणे आढळून आली होती. वैद्यकीय तपासणीत मुलीच्या पोटात केसांचा गुंता दिसून आला होता. या चिमुरडीला ट्रायकोफॅगिया(केस खाणे)(hairball), ट्रायकोटिलोमॅनिया (केस खेचणे) याचे निदान झाले होते.
केस खाल्ल्यामुळे मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम झाला होता. ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामध्ये केसांचा मोठा गुंता (hairball)पोटात अडकतो आणि तो लहान आतड्यात पसरतो. हे नाव रॅपन्झेलच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, रॅपन्झेल सिंड्रोम प्रामुख्याने मानसिक विकार असलेल्या तरुण महिलांमध्ये होतो. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुलीच्या आईने सांगितले की, आमच्या मुलीला दुर्मिळ रॅपन्झेल सिंड्रोम असल्याने आम्ही खूप घाबरलो होतो. मात्र जेरबाई वाडीया हाँस्पिटल फाँर चिल्ड्रेन येथील डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने मुलीला नवीन आयुष्य मिळाल्याची भावना मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला या आजाराबाबत सांगतात, ट्रायकोबेझोअर नावाचा हा एक दुर्मिळ आजार असतो. मानसिक स्थिती अस्थिर असली की व्यक्ती केस ओढण्यावर आणि खाण्यावर लक्ष केंद्रीत करतो. वाडिया हॉस्पिटलच्या टीमने या 10 वर्षांच्या रुग्णावर प्रभावी उपचार करत केवळ मानसिक विकार म्हणून न पाहता, तिच्या शारीरीक आरोग्याचीही विशेष खबरदारी घेतली आहे.