(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Cruise Drug Case : शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांना मुंबई पोलिसांचं दुसरं समन्स; चौकशीसाठी गैरहजर
Mumbai Police Summons to Pooja Dadlani : शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांना मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स पाठवलं आहे. परंतु ददलानी यांनी प्रकृतीची सबब देत मुंबई पोलिसांकडे पुन्हा वेळ मागितला आहे.
Mumbai Cruise Drug Case : Mumbai Police Summons to Pooja Dadlani : क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलच्या एफिडेबिटसोबतच इतर तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्क्वॉयरी टीम (SIT) तयार केली आहे. या पथकानं पुन्हा तपास सुरु केला, पण तपास पुन्हा एकदा थांबला कारण, दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर झालीच नाही. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय कारवाई करावी यासाठी मुंबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं की, पूजा ददलानीचा जबाब या प्रकरणातील तपास आणि FIR रजिस्टर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ददलानी आपल्या प्रकृतीची सबब देत मुंबई पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आणखी काही वेळ मागत आहे. मुंबई पोलिसांकडून नेमण्यात आलेल्या SIT नं याप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या सर्व बाबींची माहिती मुंबई पोलीस कमिश्नर हेमंत नगराळे यांना दिली आहे.
SIT आता लवकरच पूजा ददलानीला तिसरं समन्स पाठवणार आहे. जर पूजा तिसऱ्या समन्सनंतरही मुंबई पोलिसांसमोर हजर राहिली नाही, तर मात्र मुंबई पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त काल 15 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी सॅम डिसूझाचा जबाब नोंदवला आहे. आतापर्यंत याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकूण 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
प्रभाकर साईलनं आपल्या एफिडेव्हिटमध्ये आरोप लावला होता की, सॅम मिडल मॅन आहे आणि त्यानेच KP गोसावी, मनीष भानुशालीसह इतरांना कनेक्ट करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच, प्रभाकर साईलनं आणखी एक आरोप लावत म्हटलं आहे की, त्यानं ऐकलं होतं की, सॅम आणि गोसावी 25 कोटींच्या डिलबाबत बोलत होते. त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंना देण्यात आले आहेत.
दरम्यान, या 6 प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीचं पथक दिल्लीहून मुंबईला पोहोचलं आहे. या पथकात 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचं नेतृत्व संजय सिंह करत आहेत. या पथकात एक AD, दोन SP, 10 IO आणि JIO आहेत. दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीन वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. एनसीबीचं आणखी एक पथक याच प्रकरणी आपला तपास पुढे सुरु करणार आहे.