(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांचा छापा, कोट्यवधी रुपयांची लूट
Mumbai Crime : बनावट ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mumbai Crime : बनावट ईडी अधिकाऱ्यांनी (Fake ED Officials) मुंबईच्या (Mumbai) झवेरी बाजार (Zaveri Bazar) परिसरात छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर चार अज्ञात लोकांनी छापा टाकला आणि स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही बेड्या घातल्याचं सूत्रांनी सांगितले. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि तीन किलो सोने चोरुन नेले.
लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 1 कोटी 70 रुपये
बनावट ईडी अधिकाऱ्यांनी लुटलेल्या सोन्याची दागिन्यांची एकूण किंमत एक कोटी 70 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे चोरी
स्पेशल 26 या चित्रपटात खोटे अधिकारी बनून जशी लूटमार करण्यात आली होती तशीच मुंबईतील ही घटना आहे. या चोरीची आता संपूर्ण मुंबईभर चर्चा सुरु आहे. फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी तब्बल 25 लाखांची रोख रक्कम आणि 1 कोटी 70 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याने पोलीस प्रशासन देखील हादरलं आहे. आता या प्रकरणातील आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
बनावट हॉलमार्क प्रकरणी काल मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई
भारतीय मानक ब्युरोने (BIS) काल (23 जानेवारी) बनावट हॉलमार्क केलेले दीड कोटीहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने जप्त केले. नागपूर शहर, पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी छापे टाकून ही मोठी कारवाई करण्यात आली. हे छापे एकाच वेळी टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार परिसरात सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन छोट्या संस्थांवर छापे टाकण्यात आले.
मुंबईतील सर्वात मोठा सराफा बाजार
काळबादेवी इथला झवेरी बाजार हा मुंबईतील सर्वात मोठा सराफ बाजार आहे. अंबालाल झवेरी हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध सोनार होते. संपूर्ण देशाला पुरवठा होणाऱ्या सोने-चांदीची 60 ते 65 टक्के उलाढाल याच बाजारातून होते. हा बाजार मुंबईची जुनी ओळख आहे. या बाजारात चार लाख कारागीर काम करतात. भारतातील सर्वाधिक सोन्या, चांदीच्या दागिन्यांची निर्यात ही झवेरी बाजारातून होते. ही निर्यात प्रामुख्याने मध्य आशियातील देशांमध्ये होते.