Coronavirus | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीएमसीचा मेगाप्लॅन; कोरोनाबाधित, होम क्वॉरन्टीन व्यक्ती फिरताना आढळल्यास थेट एफआयआर
मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने मेगाप्लॅन आखला आहे. कोरोनाबाधित, होम क्वॉरन्टीन व्यक्ती फिरताना आढळल्यास थेट एफआयआर दाखल होणार आहे. शिवाय लग्न कार्यालये, रेस्टॉरंट्स, नाईट क्लबवर धाडसत्र सुरु होणार आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मेगाप्लॅन आखला आहे. मुंबईत आता कोरोनाबाधित, होम क्वॉरन्टीन व्यक्ती फिरताना आढळल्यास थेट एफआयआर दाखल होणार आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्लाब सिंह चहल यांची सर्व वॉर्ड ऑफिसर, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागासोबतची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हे आदेश दिले आहेत.
काय आहे बीएमसी प्रशासनाचा मेगाप्लान?
- लग्न कार्यालये, रेस्टॉरंट्स, नाईट क्लबवर धाडसत्र सुरु होणार
- दर दिवसाला प्रत्येक वॉर्डमध्ये किमान चार लग्न कार्यालये, चार रेस्टॉरंटस् आणि किमान एक नाईट क्लबवर धाड टाकून कारवाई करणार
- मध्य, पश्चिम आणि हार्बर या लोकलच्या तीनही मार्गांवर एकूण तीनशे मार्शल तैनात करणार
- लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण आणि होम क्वॉरन्टीन होण्याच्या सूचना असलेले हाय रिस्क कॉन्टॅक्ट बाहेर फिरताना आढळल्यास थेट एफआयआर दाखल होणार
मुंबईत मागील दोन महिन्यातील सर्वाधित रुग्णवाढ
दरम्यान मुंबईत काल 24 तासात 721 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे. 721 रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे बरचेसे रुग्ण हे होमक्वॉरन्टीन आहेत. 98 टक्के वाढलेल्या केसेस या हायराईज सोसायटीमधील आहेत. झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या भागातून जास्त रुग्ण नाहीत. मुंबईत मंगळवारपर्यंत 13 हजार चाचण्या होत होत्या. काल 18 हजार 500 चाचण्या केल्या असत्या 721 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. चाचणीचं प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे. परिणामी मुंबईतील कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर 4.50 टक्के इतका आहे.
संबंधित बातम्या