Neelkamal Boat Accident : मुंबईच्या बोट दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढला, 14 जणांचा मृत्यू, सात वर्षांचा जोहार पठाण अद्याप बेपत्ता
Elephanta Boat Accident : नेव्हीच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिस आणि इंडियन नेव्हीकडून तपास करण्यात येणार आहे.
मुंबई : एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोट अपघातात आता मृतांच्या संख्येत वाढ झाली असून ती 14 वर पोहोचली आहे. अपघात झाल्यापासून बेपत्ता असलेल्या 43 वर्षीय हंसाराम भाटी यांचा मृतदेह अखेर सापडला. भाऊच्या धक्क्याजवळ हा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी तो जे जे रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या अपघातात सात वर्षीय जोहान निस्सार पठाण अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेनं निघालेली नीलकमल या प्रवासी बोटीचा समुद्रात अपघात झाला. इंडियन नेव्हीच्या एका स्पीडबोटीने समोरून धडक दिल्यामुळे नीलकमल बोट बुडाली आणि त्यामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 11 प्रवासी आणि नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नेव्हीच्या ज्या बोटीनं नीलकमल बोटीला धडक दिली त्या बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू होती अशी प्राथमिक माहिती आहे. इंजिनात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला की आणखी काही इतर कारण आहे याची चौकशी आता नेव्हीकडून करण्यात येणार आहे.
अपघाताचा गुन्हा दाखल
या अपघात प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेव्हीच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कुलाबा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या बचावासाठी धावून गेलेल्या नाथराम चौधरींच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नेव्हीच्या बोटीने दिलेल्या धडकेनंतर नीलकमल बोट बुडत असताना प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते. त्यावेळी त्यांच्या मदतीला दोन सीआयएसफ जवानांची 'शेरा 1' पेट्रोलिंग बोट मदतीसाठी धावली. बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय.
या अपघातातल्या मृतांमध्ये मूळच्या गोव्याच्या एका महिलेचा आणि तिच्या मुलाचाही समावेश होता. गोव्याच्या या पठाण कुटुंबातील पाचजण दुर्घटनाग्रस्त बोटीवर होते. त्यापैकी तिघंजण सुदैवानं वाचले. बोटीवर पुरेशा लाईफ जॅकेट्सची व्यवस्था असती, तर आमच्या कुटुंबातील इतर दोन व्यक्तीही या जगात असत्या असं वाचलेल्या सदस्यांचं म्हणणं आहे.
बोट अपघात प्रकरणी नऊ जणांचे जबाब
मुंबईतील प्रवासी बोटीच्या अपघात प्रकरणात कुलाबा पोलिसांनी नऊजणांचे जबाब नोंदवले आहेत. या अपघातात तीन परदेशी नागरिकांचाही समावेश होता. त्यापैकी दोघं जर्मनीचे आणि एक कॅनडाचा नागरिक होता. नौदलाच्या स्पीड बोटीवर सहाजण होते आणि त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून दोघंजण गंभीर जखमी आहेत.
स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरु असताना, ती वेगानं प्रवासी बोटीला धडकून अपघात झाला. त्यामुळं दुर्घटनाग्रस्त स्पीड बोटीची आता तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस नौदलाशी पत्रव्यवहार करणार आहेत. नीलकमल या अपघातग्रस्त प्रवासी बोटीची क्षमता 90 प्रवाशांची होती. पण अपघाताच्या वेळी बोटीवर 111 प्रवासी असल्याचं उघडकीस आलं आहे. वास्तविक फेरी बोटीच्या प्रवाशांनी बोटीत बसण्याआधीच लाईफ जॅकेट घालणं अनिवार्य आहे. पण नीलकमल बोटीतल्या प्रवाशांना लाईफ जॅकेट्स देण्यात आलेली नव्हती असंही समोर आलं आहे.
ही बातमी वाचा: