CNG Price Protest : महानगर गॅस कार्यालयावर रिक्षा चालकांचा मोर्चा; कमी दरात सीएनजी देण्याची मागणी
CNG Gas Price Hike : रिक्षा चालकांना सवलतीच्या दरात सीएनजी गॅस देण्यात यावा या मागणीसाठी मुंबईतील रिक्षा चालकांनी आज मोर्चा काढला.
CNG Gas Price Hike : सीएनजीच्या दरवाढीने हैराण झालेल्या ऑटोरिक्षा चालकांनी मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या कार्यालयावर आज मोर्चा काढला. ऑटोरिक्षा चालकांना सीएनजी इंधन कमी दराने (अनुदानीत दराने) मिळावे या व इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मागील काही महिन्यात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजीवरील करात कपात केली होती. त्यानंतरही सीएनजी दरात वाढ झाल्याने रिक्षा चालकांना आर्थिक ताळमेळ बसवताना कसरत करावी लागत आहे.
'प्रदुषण मुक्त मुंबई' या उद्देशासाठी ऑटोरिक्षा चालक मालकांना त्यांची वाहने सीएनजी इंधनावर चालविण्यास, नवीन खरेदी करण्यास सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व ऑटोरिक्षा सीएनजी इंधनावर धावत आहेत. त्याशिवाय, खाजगी वाहनांनी सुद्धा सीएनजी इंधनाचा वापर करावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे सीएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच आहे.
ऑटोरिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचे साधन आहे. दररोज लाखो प्रवासी दररोज मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात ऑटोरिक्षाचा आवर्जून वापर करत आहेत. भारतात मिळणारा सीएनजी गॅसच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात सीएनजी परदेशातून आयात करण्यात येत आहे. परिणामतः सीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारचा महानगर गॅस लिमिटेड मध्ये 10% भांडवली हिस्सा आहे. ऑटोरिक्षा मधून होणारी प्रवासी वाहतूक ही सार्वजनिक सेवा असल्याने मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने महानगर गॅस लिमिटेड (एम.जी.एल.) आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. या पत्रात भारतात केंद्र सरकार ठरवून देत असलेल्या दरात सीएनजी देण्याची मागणी करण्यात आली होती. ऑटोरिक्षा चालकांना कमी दरात सीएनजी मिळाल्याने प्रवाशांवर दरवाढीचा बोझा पडणार नसल्याचे युनियनने म्हटले होते. मात्र, या मागणीबाबत कोणताही प्रतिसाद न आल्याने शशांक राव यांच्या नेतृत्वात मुंबईतील रिक्षा चालक मालकांनी आज मोर्चा काढला.
रिक्षा चालकांनी व्यक्त केली व्यथा
दिवसेंदिवस सीएनजीच्या भाव वाढत असल्याने रिक्षावर उदरनिर्वाह करत असलेल्या रिक्षाचालक व मालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कमवत असलेल्या पैशांमधून सीएनजीलाच पैसे अधिक जात असल्याने खाण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी पैसे उरत नसल्याचं रिक्षा चालकांनी म्हटले. तसेच कोरोना काळात रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे कर्जाचे ओझे देखील वाढले आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याची व्यथा रिक्षा चालकांनी व्यक्त केली.