(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morris Noronha: मी अभिषेकला सोडणार नाही, संपवणारच! मॉरिस सतत एकच वाक्य बोलायचा, मॉरिसच्या पत्नीचा जबाब
Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकरांवर फायरिंग होण्यापूर्वी काय घडलं? मॉरिसच्या पत्नीचा पोलिसांसमोर महत्त्वाचा जबाब
मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मॉरिस नोरोन्हा या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीने घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारविरोधात आरोपांची चांगलीच राळ उडवून दिली होती. ही घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळी येत पंचनामा करुन पुढील तपासाला सुरुवात केली होती. गेल्या काही तासांमध्ये गुन्हे शाखेने वेगाने तपास करत अनेक गोष्टी उजेडात आणल्या आहेत. या सगळ्यामध्ये मॉरिस नोरोन्हा (morris noronha) याच्या पत्नीने दिलेला जबाब महत्त्वाचा ठरला आहे. मॉरिसच्या पत्नीच्या जबाबावरुन त्याने अभिषेक घोसाळकर यांना संपविण्याचा कट आधीपासूनच आखल्याचे निष्पन्न होत आहे.
मॉरिसच्या पत्नीने गुन्हे शाखेच्या युनिट ११ च्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला. यावेळी तिने म्हटले की, मॉरिस हा एका बलात्काराच्या प्रकरणात तब्बल पाच महिने तुरुंगात होता. अभिषेक घोसाळकर यांनीच आपल्याला या बलात्कारप्रकरणात गोवल्याची मॉरिसची समजूत होती. तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. मात्र, त्याच्या मनात अभिषेक घोसाळकर यांच्याविषयीचा राग कायम होता. घरात असताना मॉरिस अनेकदा म्हणाला होता की, ‘मी अभिषेकला सोडणार नाही त्याला संपवणारच’, असे मॉरिसच्या पत्नीने सांगितले. मॉरिसच्या पत्नीने दिलेली ही माहिती तपासात महत्त्वपूर्ण दुवा ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मॉरिसच्या पत्नीला पुन्हा जबाब नोंदवण्यसााठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात ती पोलिसांनी आणखी कोणती माहिती देणार, हे पाहावे लागेल.
मॉरिसने अभिषेक घोसाळकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल कोणाचे?
पोलिसांच्या तपासादरम्यान अभिषेक घोसाळकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मॉरिस नोरोन्हाचा अंगरक्षक मिश्रा याला ताब्यात घेतले आहे. मॉरिसने ज्या बंदुकीतून घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या ती बंदूक मिश्रा याची होती. ही बंदूक परवानाधारक होती. पोलीस सध्या या सगळ्याविषयी अंगरक्षक मिश्राकडून माहिती घेत आहेत.
फेसबुक लाईव्हनंतर नेमकं काय घडलं?
मॉरिस दहिसर-बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. परिसरात मॉरिसची स्वयंघोषित नेता म्हणून ओळख होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.अभिषेक घोसाळकरांनी नोरोन्हा विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्री देखील झाली होती. गुरुवारी रात्री दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत आलं असताना मॉरिसनं गोळ्या झाडल्या.
आणखी वाचा
गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया