(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rains: मुंबई, ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू
Mumbai Rains: मुंबई, ठाण्यासह परिसरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
Mumbai Rains Updates: उशिराने आगमन झालेल्या पावसाने आजही मुंबईत दमदार हजेरी लावली. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. दुपारच्या सुमारास पावसाने थोड्या वेळेसाठी विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. आज रात्रीदेखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, मुंबईत घरावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील तज्ज्ञ सुषमा नायर यांनी म्हटले की, कोकण किनारपट्टी परिसरात ढगांची दाटी आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा आम्ही दिला आहे.
सोबतच रडारमध्ये देखील मुंबईच्या आजूबाजूला पावसाच्या ढगांची दाटी दिसत आहेत. ठाणे, उल्हासनगर, भाईंदर, कल्याण परिसरात देखील ढगांची दाटी आहे. ठाण्याच्या आजूबाजूला मोठा पाऊस होतोय. आजसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी 200 मिमी पर्यंत पावसाचा अंदाज नायर यांनी वर्तवला.
घरावर झाड कोसळून एकाचा मृत्यू
गोरेगाव पश्चिम येथील ओल्ड बीएमसी कॉलनी येथे झाडांची फांदी घरावर कोसळल्याने एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. झाडाची फांदी घरावर पडल्यानंतर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जवळच्या प्रार्थना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.
मुंबई मेट्रो स्थानकाजवळील जमीन खचली
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या शेजारील खाजगी इमारतीचे बांधकाम सुरू असताना जमीन खाली खचली आहे. मुसळधार पावसातच काम सुरू असल्यामुळे ही जमीन खाली खचली गेली, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र ही जमीन खचल्यामुळे माघाटाने मेट्रो स्थानकाजवळ महापालिकेच्या अतिरिक्त येणारा रस्ता देखील खचला आहे.
महापालिका यंत्रणा सज्ज
हवामान खात्याने आज मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आमची सकाळपासून आमची यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. सखल भागात पाणी साचते, त्या परिसराचा आढावा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस किती पडेल हे आम्हाला सांगता येत नाही मात्र आमची यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
लोक मोठ्या प्रमाणात कचरा नाळ्यात टाकत आहेत. अंधेरी सबवे परिसरातील नाळ्यात तर एक फ्रीज आढळला. त्यामुळे कचरा असेल तर असं पाणी साचणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी साचू न देणे आणि साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर करणे याबाबत महापालिका खबरदारी घेत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
मुंबईत वाहतूक कोंडी
पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. पूर्व द्रूतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्गासह इतर मार्गांवरील वाहतूक मंदावली होती.
भिवंडीत वाहतुकीला ब्रेक
भिवंडीत होत असलेल्या मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाण्यातील मासुंदरा तलाव परिसरातील दत्त मंदिरासमोरील ११० वर्षापूर्वीचे उंबर झाड कोसळले
ठाण्यात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. सकल भागात पाणी साचले आहे. अशातच ठाण्यातील मासुंदरा तलाव परिसरातील दत्त मंदिरासमोरील 110 वर्षापूर्वीचे उंबर झाड कोसळलेल आहे. त्यामुळे तलावपाली परिसरातील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वडाचे झाड एक रिक्षा आणि एका कारवर पडलेलं होतं. त्यामुळे रिक्षा आणि चार चाकीचे नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंब्रा बायपासवर दरड कोसळली....सुदैवाने मोठा अपघात टळला...
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर दुपारीही कायम राहिला. साधारण 3.30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवर दरड कोसळली. खडी मशीन रोड मुंब्रा बायपास ठाणेकडे येणाऱ्या मार्गावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ दरडी बाजूला करण्याचे काम सुरू केले.
उल्हासनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या रिक्षावर झाड कोसळले
विद्यार्थ्यांच्या रिक्षेवर झाड कोसळले. आर के अभांगे शाळेतील विद्यार्थी घरी जात असताना ही घटना घडली. उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथील पेट्रोल पंप जवळ हा अपघात घडला. एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी रिक्षाचालकला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पावसाची आकडेवारी (सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत)
मुंबई (सांताक्रुज) - 77 मिमी
ठाणे - 148.57 मिमी
रत्नागिरी - 58.3मिमी
अलिबाग - 84.4 मिमी
पुणे - 8.6 मिमी