(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उल्हासनगर मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना : क्षणार्धात कुटुंब उध्वस्त, स्वप्नांचा झाला चुराडा
उल्हासनगर मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटनेत उल्हासनगर मधील डोटवाल कुटुंबावर घाला
उल्हासनगर : ताटातील घास पोटात जाण्याआधीच जेवणाच्या ताटावर बसलेले हरेश डोटवाल यांचे हसते खेळते संपूर्ण कुटुंबच काल (शनिवार) उल्हासनगरच्या मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटनेत क्षणार्धात उध्वस्त झाले. मागे राहिलेल्या अमिषाने आपले आई-वडील आणि बहिणीला स्वतःच्या डोळ्यांसमोर मातीच्या ढिगाऱ्यात गतप्राण होताना पाहिले. या धक्क्यातून तिला सावरण्याचा प्रयत्न तिचे नातेवाईक करत असले तरी आपण पोरके झाल्याची जाणीव तिला या धक्क्यातून सावरू देत नाही.
हरेश डोटवाल हे त्यांची पत्नी संध्या मुली अमिषा व ऐश्वर्या यांच्यासोबत उल्हासनगर 1 नंबर मधील मोहिनी पॅलेस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होते. हॉटेलमध्ये नोकरी करून आपल्या दोन मुलींना उच्च शिक्षण देण्याचे ध्येय बाळगलेल्या हरेश डोटवाल यांचे स्वप्न पूर्ण होत होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. त्यांची मोठी मुलगी ऐश्वर्या हिने फेब्रुवारी महिन्यात चांगल्या गुणांनी सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आई वडीलांच्या कष्टाची परतफेड करण्याची स्वप्ने ती रंगवत होती. तर धाकटी मुलगी अमिषा एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
शनिवारी दुपारी हरेश कामावरून परत आल्यानंतर हरेश त्यांची पत्नी संध्या, मुलगी ऐश्वर्या आणि अमिषा हॉलमध्ये जेवायला बसले होते. काहीतरी आणण्यासाठी म्हणून अमिषा स्वयंपाकघरात गेली आणि इतक्यात मोहिनी पलेस ही इमारतिचा स्लब पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. हॉलमध्ये जेवत असलेले तिघेही जन या मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले तर त्यांच्या किंकाळ्यांनी अमिषा बाहेर धावली. मात्र, समोर काही क्षणापूर्वी असलेल्या हॉलमध्ये पडलेला खड्डा आणि मातीचा ढिगारा पाहून ती सुन्न झाली. अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला बाहेर काढले आणि त्यानंतर तिच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. तिचे आपले जवळचे तिघेहीजण तिला सोडून गेले होते. एक हसते खेळते कुटुंब क्षणार्धात उध्वस्त झाले आणि आपल्या मुलींना उच्चशिक्षित पाहण्याचे वडिलाचे स्वप्न अधरे राहिल्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून अमिषा अद्याप सावरलेली नाही. तिच्या काकांनी तिला पोटाशी कवटाळले असले तरी डोक्यावरील छत आणि मायेचा हात देखील हिरावला गेल्याने ती उध्वस्त झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी उल्हासनगर मधील अनधिकृत, धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केलीय.