मोबाईल चोराचा पाठलाग आला जीवाशी, महिला ट्रॅकवर पडल्याने गंभीर जखमी
मोबाईल चोराचा पाठलाग करणाऱ्या एका पश्चिम रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा जीव जाता जाता वाचलाय. त्यानंतर सीसीटिव्ही आधारे रेल्वे पोलिसांनी देखील चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
![मोबाईल चोराचा पाठलाग आला जीवाशी, महिला ट्रॅकवर पडल्याने गंभीर जखमी Mobile Thief the woman fell on the track and was seriously injured in Mumbai मोबाईल चोराचा पाठलाग आला जीवाशी, महिला ट्रॅकवर पडल्याने गंभीर जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/09/17dafe8776bf94749a8c39ca3642de46_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांचा जीव सुरक्षित नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. कळवा स्टेशनवरील मोबाईल चोरामुळे जीव गेल्याची घटना आपण पाहिली होती. अगदी तसाच प्रकार पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवर घडला आहे. यात मोबाईल चोराचा पाठलाग करणाऱ्या एका पश्चिम रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा जीव जाता जाता वाचलाय. त्यानंतर सीसीटिव्ही आधारे रेल्वे पोलिसांनी देखील चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर काल दुपारी ही घटना घडलेली आहे. विरारवरून सुटलेली लोकल संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान दादर स्थानकात आली. याच लोकलमध्ये स्नेहल हूलके नावाची महिला प्रवास करत होते. स्नेहल हल्लीच पश्चिम रेल्वेमध्ये ज्युनियर इंजीनियर या पदावर रुजू झाली. तिला साडेपाच वाजता आपल्या कामावर पोहचायचे होते. पण तिच्या नकळत मागून येऊन एका व्यक्तीने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि धावत्या ट्रेनमधून तो खाली उतरला. मोबाइल गेल्याचे लक्षात येताच स्नेहल देखील त्याच्या मागे धावली मात्र तिने पाय बाहेर टाकताच प्लॅटफॉर्म संपल्याने ती थेट रुळांवर पडली. तिचे सुदैव म्हणावे लागेल म्हणून ती लोकलच्या चाकाखाली आली नाही. मात्र या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आहे.
ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी ही घटना लक्षात येताच त्यांनी स्नेहलला पश्चिम रेल्वेच्या जग जीवन राम रुग्णालयात दाखल केले. पण ताबडतोब आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने 2 तपास पथकांनी 3 तासात राहुल बुटिया या आरोपीला अटक केली. राहुल हा 25 वर्षांचा असून तो कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचे काम करतो. या आधी त्याने कधीच गुन्हा केला नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पण त्यादिवशी त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 17 हजारांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)