महाअधिवेशनासाठी मनसेची जय्यत तयारी; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
मुंबईत उद्या मनसेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. मनसेकडून अधिवेशनासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
मुंबई : 23 जानेवारीला म्हणजेच उद्या मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होणार आहे. त्यात मनसेच्या नव्या झेंड्याचं लोकार्पण होणार आहे. हा नवा झेंडा आणि मनसेचं निवडणुकीचं चिन्ह एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या झेंड्यावर राजमुद्रा आहे. मनसेच्या या झेंड्याचं अधिकृत लोकार्पण झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. मनसेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच अधिवेशनात मनसे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ्मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्याच्या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या राजकारणाची कूस बदलू शकतात. कारण राज ठाकरेंचा पुढील अजेंडा भगवा आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचे नवीन ध्वज एबीपी माझाला मिळाले आहेत. मनसेनं निवडणूक आयोगाला दोन ध्वज पाठवले आहेत. एकावर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन आहे तर दुसऱ्यावर शिवमुद्रा आहे. विशेष म्हणजे दोन्ही झेंड्यात फक्त आणि फक्त भगव्या रंगाला स्थान आहे. यापूर्वीच्या मनसेच्या झेंड्यात पाचरंग होते. एवढचं नाहीतर मनसेच्या अधिकृत ट्विटर, फेसबुक हँडलवरुन मनसेचा झेंडा हटवण्यात आला असून फक्त पक्षाचं चिन्ह इंजिन वापरण्यात आलं आहे. तसेच, निवडणुकीसाठी मनसेकडून पक्षाचं चिन्ह असलेला झेंडा वापरण्यात येणार असून मागील काळात राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे शिवमुद्रा असलेला झेंडा शिवजयंती, महाराष्ट्र दिन व अन्य मराठी सणांमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : राज ठाकरेंचा नवा अजेंडा; मनसेच्या नव्या झेंड्यात प्रथमच पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईत होणाऱ्या अधिवेशनासाठी मनसेने पोस्टरबाजीही केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेनाभवनाबाहेर लावलेल्या पोस्टरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला होता. या पोस्टरचा रंग भगवा असल्याने काही दिवसांपूर्वी मनसेचं भगवेकरण होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होतं. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोणतेही पोस्टर्स चार रंगात असायचे आता मात्र भगव्या रंगात हे पोस्टर्स दिसत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचवाल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला मुंबईत मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होणार आहे. शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादीशी जुळवून सत्ता मिळवल्याने अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते दुखावले गेल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता मनसे दुखावलेल्यांना साद घालण्यासाठी पुढे आली असून मनसे अधिकृत झेंड्याची घोषणा करणार आहे.
संबंधित बातम्या :
मनसेचा प्रस्तावित नवा झेंडा, भगव्या रंगातून बदलत्या राजकारणाची दिशा
महाराष्ट्र धर्म सम्राट.. शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी
मनसे उमेदवाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा आरोप